बँक लुटण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला 69 वर्षीय व्यक्तीने मिठी मारून भावूक केल्याची घटना घडली आहे. 'एबीसी न्यूज'च्या रिपोर्टनुसार, सोमवारी, 22 मे रोजी 69 वर्षीय मायकल आर्मस 'बँक ऑफ द वेस्ट'च्या शाखेत चेक जमा करण्यासाठी पोहोचले. तेव्हा त्यांनी पाहिलं की एक मास्क लावलेला माणूस बॅंकेच्या कर्मचार्याला कॅश काउंटरवर धमकावत होता आणि म्हणाला की, त्याच्या बॅगेत स्फोटके आहेत. त्याला पैसे न दिल्यास तो ब्लास्ट करेल.
बँक लुटण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे हे शब्द ऐकून बँक कर्मचाऱ्यासह इतर लोक घाबरले, पण वृद्ध व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता त्या व्यक्तीशी बोलायला गेला. मायकल यांनी मास्क लावलेल्या व्यक्तीशी संवाद साधायला सुरुवात केली. काय प्रकरण आहे? तुला काही काम नाही का? असा प्रश्न विचारला. यावर त्या व्यक्तीने या शहरात माझ्यासाठी काहीही नाही. मला फक्त तुरुंगात जायचे आहे असं उत्तर दिलं.
मायकलने बँक लुटण्यासाठी आलेल्या व्यक्तीला कॅश काउंटरपासून थोडं दूर दारापाशी नेलं आणि त्याला पटकन मिठी मारली. वृद्धाने मिठी मारताच बँक लुटण्यासाठी पोहोचलेली व्यक्ती भावूक झाली आणि रडू लागली. याच संधीचा फायदा घेत बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर वुडलँड पोलीस अधिकाऱ्यांनी बँकेत पोहोचून त्या व्यक्तीला अटक केली.
चौकशीदरम्यान पोलिसांना कळले की या व्यक्तीचे नाव एडुआर्डो प्लेसेंसिया असून तो 42 वर्षांचा आहे. त्याच्याकडे कोणतीही स्फोटके नसल्याचं त्याने सांगितलं. त्याला फक्त धमकी देऊन पैसे लुटायचे होते. सध्या पोलिसांनी या व्यक्तीविरुद्ध दरोडा टाकण्याचा प्रयत्न, धमकी देणे, भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याच वेळी, वुडलँड पोलिसांनी एक फेसबुक पोस्ट टाकून वृद्ध मायकलच्या शौर्याचे आणि समजूतदारपणाचे कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.