(Image Credit : citizen.co.za)
मोबाइल कंपनीमुळे कुणी समलैंगिक होऊ शकतं का? असा प्रश्न तुम्हालाही चक्रावून सोडेल. एकतर हा प्रश्न फारच विचित्र आहे. दुसरं म्हणजे कुणीही या प्रश्नाचं उत्तर नाही असंच देतील. पण रशियात एक अशी घटना समोर आली आहे. आणि या घटनेने सर्वांनाच थक्क केलं आहे. येथील एका व्यक्तीने अॅपल कंपनीवर केस ठोकली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, आयफोनमुळे तो समलैंगिक झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने २०१७ मध्ये आयफोनमध्ये एक अॅप्लिकेशन डाऊनलोड केलं होतं. या अॅपच्या माध्यमातून त्याने क्रिप्टो करन्सी बिटकॉइनची ऑर्डर दिली होती. पण बिटकॉइनच्या बदल्यात त्याला ६९ गेकॉइन्स पाठवण्यात आले. यासोबत एक मेसेजही पाठवण्यात आला. ज्यात लिहिले होते की, 'ट्राय करून पाहिल्याशिवाय निर्णय घेऊ नको'.
या व्यक्तीला वाटलं की, मेसेजमध्ये लिहिलेली गोष्ट अगदी बरोबर आहे. कारण ट्राय केल्याशिवाय कुणी एखादी गोष्ट कसं ठरवू शकतं. त्यानंतर त्याने समलैंगिक नातं ठेवण्याचा निर्णय घेतला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्यक्तीने सांगितले की, आता त्याचा एक बॉयफ्रेन्ड आहे. पण तो या गोष्टीने चिंतेत आहे की, तो याबाबत त्याच्या घरच्या लोकांना कसं सांगणार. तो म्हणाला की, आता त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे आणि कदाचित तो आधीसारखा सामान्य कधीही होऊ शकणार नाही.
आता या व्यक्तीने अॅपल कंपनीवर फसवणूक करून समलैंगिकतेकडे ढकलण्याचा आरोप लावला आहे. या गोष्टीमुळे नैतिक त्रास आणि मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचल्याने त्याने केस दाखल केली आहे. तसेच त्याने कंपनीकडून ११ लाख रूपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.
या व्यक्तीच्या वकिलाने सांगितले की, त्यांचा क्लाएंट घाबरलेला असून ही घटना फारच गंभीर आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की, अॅप्लिकेशन भलेही थर्ड पार्टीकडून तयार करण्यात आलं असेल, पण त्यांच्या प्रोग्रामसाठी कंपनी जबाबदार आहे. रिपोर्ट्सनुसार, या केसची पुढील सुनावणी मॉस्कोच्या एका कोर्टात १७ ऑक्टोबरला होणार आहे.