खेळता खेळता लहान मुलांनी एखादं नाणं, छोटीशी वस्तू अथवा फळांच्या बिया गिळल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. मात्र जर तुम्हाला कोणी टूथब्रश गिळल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही पण हो हे खरं आहे. एका तरुणाने टूथब्रश गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादमधील एका 33 वर्षीय तरुणाने चक्क टूथब्रशच गिळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे डॉक्टरांनाही धक्का बसला असून ते हैराण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने पोटात वेदना सुरू झाल्याने रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाचं सीटी स्कॅन करण्यात आलं. तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश दिसला. हा प्रकार पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. तरुणाने हा ब्रश कसा गिळला असेल, असा प्रश्न डॉक्टरांसह सर्वांनाच पडला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि पोटातून टूथब्रश काढला आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तरुणाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याची माहिती दिली आहे. तरुणाच्या शरिराला यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याने आणि त्याचा जीव धोक्यात असल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. तसेच तरुणाला पुढील चार, पाच दिवसांत डिस्चार्ज मिळेल असंही म्हटलं आहे. तरुणाने चुकून टूथब्रश गिळल्याचं समजल्यानंतर कुटुंबीयांना देखील धक्का बसला होता. मात्र आता शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने त्याच्या जीवाचा धोका टळला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधील बीरभूम या जिल्ह्यामधील एका सरकारी रुग्णालयात एका महिलेच्या पोटातून तब्बल दीड किलो सोने आणि नाणी बाहेर काढण्यात आली होती. पोटात दुखत असल्यामुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेवर शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातून दीड किलो वजनाचे दागिने आणि नाणी बाहेर काढण्यात आली. या महिलेची मानसिक स्थिती चांगली नसल्यामुळे ती दागिने व नाणी खात असल्याची माहिती समोर आली होती. रामपूरहाट सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील सर्जरी विभागाचे प्रमुख सिद्धार्थ विश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 महिलेचं पोट दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोटात दुखत असल्याने अल्ट्रासाउंड तपासणी केली. त्यामध्ये पोटात दागिने तसेच नाणी असल्याचे स्पष्ट झाले. महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.