मित्रांचं आपल्या जीवनात खूप महत्वाचं स्थान असतं. त्यामुळे विचार करूनच मित्र निवडण्याचा सल्ला घरातील लोक देत असतात. मित्रांची संगत अनेकदा तुम्हाला योग्य मार्ग दाखवते, तर कधी तुमचं जीवन उद्ध्वस्तही करते. आज आम्ही तुम्हाला दोन अशा मित्रांबाबत सांगणार आहोत, ज्यांची गंमत दोघापैकी एकाच्या जीवावर बेतली. मित्रांसोबत बसून दारू पिणं ही बाब आजकाल कॉमन झाली आहे. पण नशेत केल्या गेलेल्या गोष्टी खूप महागातही पडू शकतात. अमेरिकेतील दोन मित्रांसोबत असंच काहीसं झालं. काही सेकंदात एक मित्र खूनी बनला तर दुसऱ्याचा जीव गेला. हे सगळं गंमतीगंमतीत झालं. चला जाणून घेऊ काय आहे पूर्ण घटना.
‘तेरा भाई गोली से भी बच जाएगा’
अमेरिकेच्या उटाहमधील ही घटना आहे. इथे २३ वर्षीय एश्टन जोनाथन मॅन नावाच्या तरूणाला अटक करण्यात आली. २ फेब्रुवारी रोजी एश्टन आपल्या मित्रासोबत घरी बसून होता. दोघेही बसून गांजा ओढत होते आणि बंदुकीवर चर्चा करत होते. बोलत-बोलत दोघेही गॅरेजपर्यंत गेले आणि बंदूक बघताच त्याचा मित्र म्हणाला की, तो गोळी वाचवू शकतो. आधी एश्टननं त्याचं हे स्किल टेस्ट करण्यासाठी रिकामी बंदूक चालवली आणि मित्रानं वेगानं उडी घेत स्वत:ला वाचवलं. हा खेळ ६ वेळा खेळण्यात आला आणि शेवटी एश्टननं मित्रावर गोळी झाडली. मात्र, यावेळी गोळी थेट मित्राच्या छातीत लागली आणि तो तिथेच पडला.
गमतीत गमावला जीव
मित्राला गोळी लागल्याचं पाहून एश्टननं लगेच अॅम्बुलन्स बोलवली आणि त्याला फर्स्ट एड देण्याचाही प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. पोलिसांनी या घटनेची चौकशी केली तेव्हा त्यांना घरात दोन हॅंडगन सापडल्या आणि काही कागद सापडले. ज्यावरून समजलं की, दोघेही गांजाचा वापर करत होते. पोलिसांनी एश्टनला अटक केली आणि त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. सध्या या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.