दुबईतून एक विचित्र घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिचं क्रेडीट कार्ड हॅक झाल्याची तक्रार पोलिसात दिली. पण मुळात तिचं कार्ड हॅक झालंच नव्हतं. तक्रार दिल्यावर चौकशीनंतर समोर आलं की, तिचा पती तिचं क्रेडीट कार्ड आपल्या गर्लफ्रेन्डचा ट्रॅफिकचा दंड भरण्यासाठी वापरतोय.
दुबई पोलीसमधील सायबर क्राइम डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर कॅप्टन अब्दुल्ला यांच्यानुसार, पोलिसांना एका महिलेची तक्रार मिळाली होती. तक्रारीत या महिलेने सांगितले होते की, तिचं क्रेडीट कार्ड गायब झालंय आणि ट्रॅफिकचा दंड भरण्यासाठी तिच्या कार्डचा वापर झाला आहे.
गल्फ न्यूजच्या एका रिपोर्टनुसार, महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांना चौकशी केली. पोलिसांनी चौकशी केल्यावर अशा गोष्टी समोर आल्या की, सर्वांनाच धक्का बसला. ज्या महिलेने तक्रार दाखल केली होती तिच्या पतीनेच त्याच्या गर्लफ्रेन्डसाठी या क्रेडीट कार्डचा वापर केला होता.
पोलिसांनुसार, हा सगळा प्रकार हैराण करणारा होता. तक्रार करणाऱ्या महिलेला हे माहीतच नव्हतं की, तिच्या पतीची एक गर्लफ्रेन्ड आहे. इतकेच नाही तर या व्यक्तीच्या गर्लफ्रेन्डलाही हे माहीत नव्हतं की, तो विवाहित आहे.
या प्रकरणाचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा क्रेडीट कार्ड देवाण-घेवाणीची सूचना महिलेला मिळाली. त्यानंतर महिलेने दुबई पोलिसात तक्रार देऊन कार्ड ब्लॉक केलं. तक्रारीनंतर चौकशी केली गेली तेव्हा या प्रकरणाचा भांडाफोड झाला.