मार्च महिना उजाडला, नवीन वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटत आले. वर्षाच्या सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी ‘यावर्षी मी सॉलिड फिट राहणार, अमुक-तमुक एवढं वजन कमी करणार’, असा निश्चय केला त्यांचा निश्चय कुठपर्यंत आला? हा प्रश्न विचारल्याबद्दल अनेक लोक मला शिव्या देतील किंवा काहीही कारणं देत उत्तरं टाळतील. आणि हो, या उत्तरं टाळणाऱ्या लोकांमध्ये मीसुद्धा आहे बरं का!! पण पॉलमेसन नामक गृहस्थाने अशी टाळाटाळ नाही केली कधी. अहो, अशी टाळाटाळ करणं त्याच्या जिवावरचं बेतलं असतं. पण तीन वर्षांपूर्वी पॉलने ठरवलं की त्याला मरायचं नाहीये. पॉल हा इंग्लंडमध्ये एका छोट्याशा खेड्यात राहत असे. झोपण्यासाठी दोन प्रचंड पडदे शिवून तयार केलेली एक चादर. अंगावर अनेक जखमा. या सगळ्यामध्ये पॉल केवळ त्याच्या १० फूट बाय १० फुटाच्या पलंगावर पडून राहायचं काम करायचा. तो अजून करणार तरी काय? कारण तो जगातल्या सर्वात लठ्ठ माणूस म्हणून कुप्रसिद्ध होता. पॉलचं वजन जवळजवळ ४५० किलो होतं. आणि या एवढ्या प्रचंड देहाला पोसण्यासाठी तो रोज २०,००० उष्मांकांचं खाद्य खात असे. (साधारणपणे माणूस १८०० ते २२०० उष्मांक खातो.) म्हणजे तो माणसाच्या दहापट अन्न खात असे. त्याला आपापलं उठता येत नव्हतं, आपापलं काहीही करता येत नव्हतं. सगळं करण्यासाठी माणूस आणि मुख्य म्हणजे जगभरात नामुष्की. काही वर्षांपूर्वी त्याच्या त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याने स्वत:ला संपवायचं ठरवलं आणि दोन माणसं मारू शकेल एवढा विषाचा डोस घेतला. पण हे विषही त्याला मारू शकलं नाही.पण वजन कमी करण्यापेक्षा त्याने स्वत:ला संपवणं योग्य समजलं. हे कितीतरी दु:खदायी आहे! पण हळूहळू त्याचं मत बदलायला लागलं. सर्जरी करून वजन कमी करावं असं त्यानं ठरवलं. पण या एवढ्या वजनात त्याला सर्जरी करून घेणंही अवघड होतं. मग त्यानं त्याच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि सर्जरी करण्यापुरतं का होईना वजन कमी करायचे प्रयत्न केले. त्यानंतर त्याने काय कष्ट घेतले, कोणाकोणाची मदत घेतली, आपल्या शरीराबरोबरच मनाला कशी शिस्त लावली हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा http://www.gq.com/story/how-the-worlds-heaviest-man-lost-it-all-प्रज्ञा शिदोरे
४५० किलो वजनाचा माणूस
By admin | Published: March 23, 2017 1:19 AM