गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सामान्य वस्तूंसाठी अव्वाच्या-सव्वा किंमत लावल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. यावरून सोशल मीडियात चर्चाही केली गेली आणि शेकडो मिम्सही व्हायरल झाले होते. अशीच एक घटना समोर आली असून ही आधीच्या घटनांपेक्षा अधिक हैराण करणारी ठरत आहे.
मॅन्चेस्टरच्या एका हॉटेलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराकडून एका बीअरसाठी तब्बल ५० लाख रूपये वसूल करण्यात आले. या घटनेनंतर चांगलाच गोंधळ उडाला. पत्रकार पीटर लालोर ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्रात स्पोर्ट एडिटर आहेत.
पीटर लालोर एशेज टेस्ट सीरिज कव्हर करण्यासाठी ब्रिटनला गेले होते. हॉटेलमध्ये मित्रांसोबत बसलेले असताना त्यांनी त्यांच्यासाठी एक बीअर ऑर्डर केली. ज्यावेळी पीटर या बीअरचं बिल देत होते. त्यावेळी त्यांनी चष्मा घातलेला नव्हता. दरम्यान पेमेंट मशीनमध्ये काही गडबड झाली आणि बिल पेड झालं.
जेव्हा नंतर तेथील स्टाफने बिलाची स्लीप पाहिली तेव्हा तो हैराण झाला. त्याने पीटर लालोरला सांगितलं की, तुमच्याकडून ५० लाखांपेक्षा अधिक बिल पे झालं आहे.
५० लाख रूपयांचं बिल चुकवल्यावर पीटर लगेच मॅनेजरकडे गेले. बिलात करेक्शन करण्यात सांगण्यात आलं. मॅनेजरने त्यांना आश्वासन दिलं की, अतिरिक्त पैसे लवकरच त्यांच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर होतील. हॉटेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही चूक कशी झाली याची चौकशी करत आहेत आणि ही चूक लवकरच सुधारली जाईल. झालेल्या चुकीबाबत आम्ही माफी मागतो.