Most Expensive Mango: आंबा हा जगभरातील सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. आंबा वर्षभर नसतो, त्यामुळे आंब्याच्या हंगामात लोक या फळावर तुटून पडतात. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने बाजारात आंब्याच्या विविध जाती पाहायला मिळत आहेत. भारतासह जगभरात आंब्याचे अनेक प्रकार आहेत, पण एक असा आंबा आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हाला मोठा धक्का बसेल.
आंब्याच्या या खास जातीचे नाव आहे मियाझाकी. हा आंबा फक्त जपानच्या मियाझाकी प्रांतात मिळतो. आपल्या अनोख्या चवीमुळे, बनावटीमुळे हा आंबा जगातील सर्वात महागडा आंबा बनला. याला जपानमध्ये आंब्याचा राजा असेही म्हणतात. जाणून घेऊया या आंब्याची किंमत किती आहे आणि त्याची खासियत काय आहे.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या आंब्याची किंमत 2.70 लाख रुपये प्रति किलो आहे. या आंब्याचे वजन 350 ग्रॅमपेक्षा जास्त असून त्यात सुमारे 15 टक्के साखर असते. हा आंबा जगभरात आढळणाऱ्या इतर आंब्यांपेक्षा खूप वेगळा आहे, त्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे. हा भारतासह दक्षिण पूर्व आशियामध्ये देखील लोकप्रिय आहे. असे म्हणतात की या आंब्याचा रंग रुबी रंगासारखा आहे.
मियाझाकी आंब्याची लागवड पहिल्यांदा 1980 च्या दशकात झाली. येथील शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्राचा वापर करून आंब्याची एक अनोखी प्रजाती तयार केली, जी आता जपानमध्ये सर्वोत्तम मानली जाते. जपानमध्ये हे आंबे एप्रिल आणि ऑगस्टमध्ये घेतले जातात. आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहेत. या आंब्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात आणि त्यात बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिड असते. दृष्टी वाढवण्यासाठी हे आंबे खाणे खूप फायदेशीर आहे.