Marilyn Monroe: तुम्ही अनेकदा लिलावात विविध चित्रांची लाखो किंवा कोट्यवधी रुपयांमध्ये विक्री झाल्याच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतील. पण, नुकतीच एका पेटींगची तुमच्या कल्पनेपेक्षाही दसपट जास्त किमतीत विक्री झाली आहे. दिवंगत अभिनेत्री मर्लिन मनरोचे पोर्ट्रेट एक-दोन नव्हे, तर तब्बल 1500 कोटी रुपयांना विकले गेले आहे. 1964 मध्ये हे पोर्ट्रेट तयार करण्यात आले होते. हा लिलाव क्रिस्टीजने आयोजित केला होता. तिथे एका व्यक्तीने हे पोर्ट्रेट विकत घेतले. ही आतापर्यंतची सर्वात महागडी विक्री असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मर्लिनचे पोर्ट्रेट कोणी विकत घेतले आहे, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
मर्लिनच्या पेंटिंगमध्ये विशेष काय आहे?मर्लिन मनरोचे हे पोर्ट्रेट 'शॉट सेज ब्लू मर्लिन' म्हणून ओळखले जाते. हे पेंटिंग अँडी वॉरहॉल यांनी 1964 मध्ये बनवले होते. त्यांनी वेगवेगळ्या रंगसंगतीच्या पाच आवृत्त्या रंगवल्या. हे मर्लिन मनरोच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी बनवले गेले. मर्लिनचे पोर्ट्रेट उत्कृष्ट रंग संयोजन आणि मनमोहक अभिव्यक्ती दर्शवते. हे चित्र वॉरहॉलच्या सर्वात प्रसिद्ध कलाकृतींपैकी एक आहे. मर्लिनचे हे पोर्ट्रेट तिच्या 'नायगारा' चित्रपटातील पोस्टरवर आधारित आहे.
आत्तापर्यंत पेंटिंग कोणाकडे आहे?मर्लिन मनरोचे 'शॉट सेज ब्लू मर्लिन' पेंटिंग स्विस आर्ट डीलर फॅमिली, अम्मान्सने विकले आहे. 1980 पासून हे पोर्ट्रेट त्यांच्याकडेच होते. हे विकून मिळालेले पैसे चॅरिटीमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. झुरिच थॉमस आणि डोरिस अम्मान फाउंडेशनने सांगितले की, हा निधी जगभरातील मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरला जाईल.
दुसरी सर्वात महाग कलाकृतीमर्लिनचे पोर्ट्रेट लिलावात विकली गेलेली सर्वात महागडी अमेरिकन कलाकृती आहेच. याशिवाय, जगातील दुसरी सर्वात महाग कलाकृती देखील आहे. लिओनार्डो दा विंचीची 'साल्व्हेटर मुंडी' ही सर्वात महागडी कलाकृती आहे. 2017 मध्ये त्याची सुमारे 3500 कोटी रुपयांना विक्री झाली होती. तर, पिकासोचा 'लेस फेम्स डी'अल्जर' तिसऱ्या क्रमांकावर आहे, जो 2017 मध्ये सुमारे 1400 कोटींमध्ये विकला गेला होता.
मर्लिन मनरो कोण आहे?मर्लिन मनरो ही हॉलिवूड अभिनेत्री होती. तिला लीजेंड कॅटेगरीत ठेवले जाते. ती तिच्या सदाबहार सौंदर्यासाठी ओळखली जायची. तिच्या ग्लॅमरची बरीच चर्चा झाली. मात्र, 5 ऑगस्ट 1962 रोजी वयाच्या 36 व्या वर्षी तिचे निधन झाले.