एखाद्या सिनेमाचे फॅन त्यांच्या वेगळेपणामुळे नेहमीच चर्चेत राहतात. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या सिनेमाचा इतका मोठा फॅन असतो की, त्याने कित्येक वेळा तो सिनेमा पाहिला असतो. पण आतापर्यंत तुम्ही पाहिलेल्या आणि ऐकलेल्या फॅन्सपेक्षाही मोठा फॅन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अगस्टिन अलानिस असं या फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या फॅनचं नाव आहे. अगस्टिन हा ३० वर्षांचा आहे. त्याने २६ एप्रिलला रिलीज झालेला Avengers: Endgame हा सिनेमा तब्बल १२८ वेळा पाहिलाय, तोही थिएटरमध्ये.
अगस्टिनने सांगितले की, त्याने २६ एप्रिलला फर्स्ट डे फर्स्ट शोपासून सुरूवात केली होती. तो रोज थिएटरचं तिकीट बुक करत होता आणि सिनेमा बघत होता. तो म्हणाला की, 'मला कोणताही वर्ल्ड रेकॉर्ड करायचा नव्हता. पण हो, जेव्हापासून सिनेमा रिलीज झाला आहे, तेव्हापासून रोज मी हा सिनेमा बघत आहे. आधी मी दोन आठवडे दररोज गेलो. त्यानंतर सिनेमानेही कमाईचे नवे रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. तेव्हा मी सुद्धा रोज सिनेमा बघू लागतो'.
तो सांगतो की, '२०१४ मध्ये जेव्हा Captain America: Winter Soldier रिलीज झाला होता, तेव्हाही मी हा सिनेमा घरी रोज बघत होतो. पण थिएटरमध्ये रोज सिनेमा बघण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. मला Endgame ने वेड लावलं आहे. मला नाही वाटत की, मी दुसऱ्या कोणत्या सिनेमासाठी असं करू शकेन'.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, अगस्टिन शनिवारी आणि रविवारी ४ ते ५ वेळा Avengers - Endgame हा सिनेमा बघतो. अगस्टिन हा कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहे. जेव्हा तो सिनेमा बघत नसतो, तेव्हा तो याच कामात असतो. तो सांगतो की, 'माझ्या परिवारातील सदस्य खासकरून माझी छोटी बहीण यासाठी मला प्रोत्साहित करते. जेव्हा मी १००व्या वेळी सिनेमा बघायला गेलो तेव्हा परिवारासोबत गेलो होतो'.
अगस्टिन हे सांगतो की, कॅप्टन अमेरिका लढाईदरम्यान जेव्हा थॉरचा हातोडा उचलतो, तो सीन त्याचा सर्वात आवडता सीन आहे. मजेदार बाब म्हणजे अगस्टिन ट्विटरवर रोज सिनेमाच्या तिकीटाचा फोटो शेअर करतो. त्याने याबाबत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसोबतही बोलणी केली आहे.
याआधी एकच सिनेमा थिएटरमध्ये जास्तीत जास्त वेळ बघण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड एंथनी मिशेलच्या नावावर आहे. ती नॉर्थ कॅरोलीनाला राहणारी आहे. एंथनी सुद्धा मार्व्हल फॅन आहे. तिने Avenegers : Infinity War १०३ वेळा पाहिला आहे. अगस्टिन सांगतो की, 'मी सद्याच काही प्लॅन केलेला नाही. पण मी हा सिनेमा २०० वेळा पाहण्याची शक्यता आहे'.