अंधविश्वासामुळे देशातील कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागतो हे वेळोवेळी समोर येत असतं. अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकून अनेक विचित्र गोष्टी लोक करताना दिसतात. दिल्लीमध्येही एकाच परिवारातील ११ लोकांनी अंधविश्वासाला बळी पडून आत्महत्या केली होती. पण तुम्हाला माहीत आहे का की, अमेरिकेतील गुयानाच्या जोंसटाउनमध्ये अंधविश्वासामुळे एकत्र ९०० पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली होती.या भयावह घटनेला आतापर्यंतच्या आत्महत्येच्या सर्वात मोठ्या घटनांपैकी एक मानलं जातं. ज्यात ९०० पेक्षा जास्त लोकांनी विष पिऊन आत्महत्या केली आणि ज्यांनी विष पिण्यास नकार दिला त्यांनी जबरदस्तीने दिलं गेलं.
ही घटना ४० वर्षांपूर्वीची आहे. १८ नोव्हेंबर १९७८ मध्ये ही हृदयद्रावक घटना घडली होती. ही घटना समोर येताच अनेकांना धक्का बसला होता. या घटनेमागे जिम जोन्स नावाचा एक धर्मगुरू असल्याचं सांगितलं जातं. तो स्वत:ला देवाचा अवतार सांगत होता. या घटनेची सुरूवात अशी झाली की, जिम जोन्सने लोकांमध्ये आपलं प्रस्थ वाढवण्यासाठी गरजू लोकांच्या मदतीच्या नावाखाली १९५६ मध्ये पीपल्स टेंपल नावाचं एक चर्च तयार केलं आणि आपल्या धार्मिक गोष्टी व अंधविश्वासाच्या जोरावर त्याने हजारो लोकांना आपलं अनुयायी केलं होतं.
जिम जोन्स हा एक कम्युनिष्ट विचारधारेचा व्यक्ती होता आणि त्याचे विचार अमेरिकन सरकारपेक्षा वेगळे होते. त्यामुळे तो त्याच्या अनुयायांसोबत शहरापासून दूर गुयानाच्या जंगलात निघून गेला आणि तिथे त्याने एक छोटसं गाव वसवलं. पण काही दिवसातच त्याचं खरं रूप लोकांसमोर येऊ लागलं.
जिम जोन्स हा त्याच्या अनुयायांकडून दिवसभर काम करून घेत होता आणि रात्री ते थकून झोपायला जायचे तेव्हा त्यांना झोपूही देत नव्हता. रात्री तो लोकांना भाषण देत होता. यादरम्यान त्याचे सैनिक घराघरात जाऊन बघत होते की, कुणी झोपले तर नाही ना.
जर एखादा पुरूष झोपताना आढळला तर त्याला कठोर शिक्षा दिली जात होती. इतकेच काय तर तो लोकांना गावाबाहेरही जाण्यास सांगत होता. पुरूष आणि महिला जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांच्या मुलांना कम्युनिटी हॉलमध्ये ठेवलं जात होतं. तसेच गावातून कुणीही पळून जाऊ नये म्हणून जोन्सचे सैनिक दिवस-रात्र पाळत ठेवत होते.
जिम जोन्सने आपल्या अंधविश्वासाचं जाळं इतकं पसरवलेलं होतं की, तो जे बोलायचा ते लोक मान्य करत होते. यादरम्यान अमेरिकी सरकारला त्याच्या गोष्टी कळाल्या आणि त्याच्यावर कारवाई करण्याचा विचार केला. पण याची माहिती जिम जोन्सला लागली आणि त्याने त्याच्या सर्वच अनुयायांना एक ठिकाणी जमा होण्यास सांगितले.
असे मानले जाते की, यादरम्यान जोन्स म्हणाला की, 'अमेरिकी सरकार आपणा सर्वांना मारण्यासाठी येत आहे. त्यांनी आपल्याला ठार करण्याआधी आपण सर्वांनी पवित्र जल प्यायलं पाहिजे. असं करून त्यांच्या गोळ्यांनी होणाऱ्या वेदनांचा आपल्याला सामना करावा लागणार नाही'. जिमने लोकांना सांगितले की, जर तुम्ही असं केलं नाही तर ते आपल्याला ठार करतील, आपल्यासोबत जनावरांसारखं वागतील. महिलांसोबत बलात्कार करती, लहान मुलांचा छळ करतील. हे सगळं टाळण्यासाठी पवित्र जल प्यावं लागेल.
जोन्सने आधीच एका टबमध्ये विष मिश्रित केलेलं एक सॉफ्ट ड्रिंक तयार करून ठेवलं होतं आणि हे त्याने लोकांना पिण्यासाठी दिलं. दरम्यान ज्यांनी हे ड्रिंक पिण्यास नकार दिला, त्यांना जबरदस्तीने पाजण्यात आलं. अशाप्रकारे अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकून ९०० लोकांनी आपला जीव गमावला. यात ३०० पेक्षा अधिक लहान मुलांचा समावेश होता.
या घटनेला अशाप्रकारची आतापर्यंतची सर्वात वाईट घटना मानली जाते. असे म्हटले जाते की, लोक मेल्यानंतर जिम जोन्सचा मृतदेहदेखील एकेठिकाणी आढळला होता. त्याने स्वत:वर गोळी झाडली होती किंवा कुणालातरी गोळी घालण्यास सांगितली होती.