ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्या व्यक्तीसाठी काहीही करणार अशा आनाभाका घेणारे अनेकजण बघायला मिळतात. पण फार कमी असतात जे खरंच प्रिय व्यक्तीसाठी काहीही करायला तयार होतात. दुसरा एक मुद्दा म्हणजे ज्या व्यक्तीवर प्रेम असतं त्या व्यक्तीसाठी काहीही करणारे असतीलही, पण त्या व्यक्तीच्या कुंटूंबासाठी काहीही करणारे कमीच. मात्र, २३ वर्षीय अॅन्ड्र्यू मेयजॅकने त्याच्या गर्लफ्रेन्डसाठी आणि तिच्या परिवारासाठी फारच मोठा कारनामा केलाय. अॅन्ड्र्यूने त्याची एक किडनी पॉल टरकोट यांना दान दिली. पॉल हे दुसरे तिसके कुणी नसून अॅन्ड्र्यूची गर्लफ्रेन्ड एशलचे वडील आहेत.
एशलेचे वडील हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांना लगेच किडनीची गरज होती. अॅन्ड्र्यूने जराही उशीर न करता त्याची किडनी दान करण्यासाठी होकार दिला. एबीसी रिपोर्टनुसार, पॉल यांना किडनीसंबंधी काहीतरी समस्या होती. डॉक्टरांनी सांगितले की, पॉल यांचं जीवन वाचवण्यासाठी एकमात्र उपाय म्हणजे ट्रान्सप्लांट. अॅन्ड्र्यूला याबाबत समजले तेव्हा तो जास्त विचार न करता किडनी देण्यास तयार झाला. महत्त्वाची बाब म्हणजे त्याची किडनी पॉलच्या किडनीसोबत मॅचही झाली.
'गुड मॉर्निंग अमेरिका'सोबत बोलताना अॅन्ड्र्यूने सांगितले की, 'मी लगेच तयार झालो, कारण मला हे करायचं होतं. एशलेचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे आणि माझं एशलेवर खूप प्रेम आहे. लाइफ आपल्याला दुसरी संधी देत नाही आणि मला पॉलला गमवायचं नव्हतं. हे माझ्यासाठीही सुखद अनुभव होता, कारण माझ्यामुळे त्यांचा जीव वाचला होता'.
एशले यावर म्हणाली की, 'मी माझ्या परिवाराबाबत सहजासहजी कुणाशी बोलत नाही. पण जेव्हा स्थिती फार वाईट झाली होती, तेव्हा मी अॅन्ड्र्यूला माझी चिंता सांगितली. त्याने मला साथ दिली. त्याने प्रामाणिकपणे कोणताही विचार न करता माझ्या वडिलांना किडनी दिली. असं कुणी केलं नसतं'.
अॅन्ड्र्यूने सांगितले की, 'मला असं समजलं होतं की, कुणीही नातेवाईक किडनी देण्यासाठी तयार नव्हते. मग मी यावर थोडा रिसर्च केला. मी एशले आणि तिच्या परिवाराला चिंतेत बघू शकत नव्हतो. मी अनेक टेस्ट केल्या आणि मला जसं समजलं की, माझी किडनी पॉलशी मॅच करते. मी लगेच देण्यासाठी तयार झालो. जेव्हा एशलेच्या परिवाराला याबाबत माहिती मिळाली तेव्हा ते आनंदी होते आणि माझ्यासाठी चिंतेतही होते'.
यावर एशलेचे वडील म्हणाले की, 'मी सुरूवातीला विचारात पडलो होतो. कारण त्याच्यासमोर त्याचं संपूर्ण आयुष्य आहे. त्याला फुल टाइम जॉब करायचा आहे. आजारांचा सामना करायचा आहे. ही माझ्यासाठी चिंतेची बाब होती'.
डेटिंग अॅपवर झाली होती दोघांची भेट
एशले आणि अॅन्ड्र्यूची भेट एका डेटिंग अॅपवर झाली होती. दोघांनी आधी चॅटींग केलं, नंतर डेटिंग सुरू केलं. दोघेही आज एकमेकांसोबत फार आनंदी आहेत.