अनेकदा असं होतं की आयुष्यात आपल्याला काही गोष्टी हव्या असतात. पण त्या मिळाल्या नाही की, मन दु:खी होतं. पण जीवनाला एका वेगळ्या नजरेतून बघण्याचीही गरज असते. प्रत्येकाला वाटत असतं की, त्यांनी चांगली डिग्री घ्यावी. चांगले पैसे कमवावे, नाव व्हावं, घर असाव...अशा अनेक गोष्टी. काही लोक हे सर्व आपल्या मेहनतीने मिळवतातही. असाच एका तरूण आहे प्रफुल्ल बिलौरे. त्याची एमबीए करायची इच्छा होती. पण तो आज एमबीएचा विचार सोडून चहा विकतो आहे.
Humans Of Bombay त्याने त्याच्या जीवनाची कहाणी शेअर केली आहे. त्याने सांगितले की, 'CAT ची परीक्षा फेल झाल्यावर तो फार अस्वस्थ झाला होता. त्याला ब्रेक घ्यायचा होता. त्याला फिरायला जायचं होतं. पण मध्यमवर्गीय लोकांना हे कुठे शक्य असतं. त्याला त्याच्या पालकांनी असं काही करू दिलं नाही. (हे पण वाचा : कोरोनामुळे मुंबईच्या 'शेफ'ची नोकरी गेली; पण हार नाही मानली; स्वतःच्या कारमध्येच सुरू केला फूड स्टॉल....)
तो २० वर्षांचा असताना इंटर्नशिप करताना पैसे बचत करत होता. तो म्हणाला की, तो यादरम्यान बराच फिरला. नंतर तो अहमदाबादमध्ये आला आणि त्याने इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तो पार्ट टाइम जॉब करत होता. त्याच्या पालकांना वाटत होतं की, त्याने एमबीएची डिग्री घ्यावी. त्यामुळे त्याने अॅडमिशन घेतलं. सोबतच पार्ट टाइम जॉबही करत होता.
एक दिवस तो एका चहावाल्यासोबत बोलत होता. तेव्हाच त्याला चहाची टपरी सुरू करण्याचा विचार आला. त्याने एक पातेलं, लायटर आणि चाळणी घेऊन चहाचा ठेला सुरू केला. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. तो चहाच्या टपरीवर केवळ चहा देत नव्हता. तर लोकांसोबत बोलतही होता. तो लोकांसोबत राजकारण आणि त्यांच्या लाइफबाबत गप्पा मारत होता. लोकांमध्ये तो लवकरच फेमस झाला. त्याने एमबीए सोडलं आणि पूर्णवेळ चहावाला झाला.
प्रफुल्लने जे केलं ते त्याच्या भरोशावर केलं. त्याला काही फॅमिलीने दिलं नाही ना मित्रांनी दिलं. मात्र, प्रफुल्लने स्वत:ची साथ सोडली नाही. तो सांगतो की, त्याच्या परिवारातील लोक त्याला म्हणायचे की, हे त्याच्यासाठी लाजिरवाणं आहे. मित्रही हेच म्हणत होते की, एमबीए करत होता आणि चहावाला झाला. पण त्याने हार मानली नाही.
प्रफुल्लचे आयडिया लोकांमध्ये चर्चेचा विषय बनत होते. तो लोकांचं मनोरंजन करण्यासाठी टपरीवरच ओपन माइक करू लागला. याकडे तरूणाई जास्त आकर्षित झाली. व्हॅलेंटाईन डे ला तर त्याने सिंगल लोकांना मोफत चहा दिला. ही स्टोरीही व्हायरल झाली होती. तो लग्नातही चहाचा स्टॉल लावतो. त्याने त्याच्या टपरीचं नाव 'एमबीए चायवाला' असं ठेवलं आहे.
आज प्रफुल्लची ही आयडिया फेमस झाली आहे. लोक त्याची फ्रॅन्चायची घेण्यासाठी तयार आहेत. तो अनेक कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर देऊन आलाय. लोक त्याच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतात. तो म्हणतो की, 'डिग्री मॅटर करत नाही. नॉलेज महत्वाचं आहे. मी चायवाला आहे. मी जे करतो त्यावर माझं प्रेम आहे'. चहाचा बिझनेस सुरू केल्यावर ४ वर्षात त्याने ४ कोटी रूपये कमाई करून देशभरातून कौतुक मिळवलं होतं.