(Main Image Credit : The National)
हलिमा एडन नावाची २१ वर्षीय तरूणी केवळ इतिहासच रचत नाहीये तर वैचारिक बदलावरही काम करत आहे. हलिमा सोमाली-अमेरिकन मॉडल आहे. बुरखा परिधान करून मॉडेलिंग करण्यासाठी लोकप्रिय आहे. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे तिने स्पोर्ट्स इलॅस्ट्रेटेड मॅगझिनसाठी स्वीमिंग सूट एडिशनमध्ये हिजाब आणि बुर्किनी परिधान करून इतिहास रचला आहे. असा कारनामा करणारी हमिला जगातली पहिली मॉडल ठरली आहे.
हलिमा फॅशन विश्वात एक वेगळेपण घेऊन आली आहे. तिने या वेगळेपणातून हे दाखवून दिलं आहे की, फॅशनचा अर्थ केवळ कमी कपडे परिधान करणेच नाही. इस्लामिक परंपरांची काळजी घेऊनही महिला आणि तरूणी स्टायलिश दिसू शकतात. स्पोर्ट्स इलॅस्ट्रेडेट मॅगझिन हे अनेक वर्षांपासून स्वीमिंग सूट एडिशनसाठी प्रसिद्ध आहे. पण यावेळी मॅगझिनने उचललें पाऊल क्रांतिकारी ठरत आहे. कारण आतापर्यत या मॅगझिनच्या कव्हरवर केवळ बिकीनी परिधान केलेल्या मॉडल दिसत होत्या.
बुर्किनी महिलांसाठीचा एक वेगळ्या प्रकारचा स्वीमिंग सूट आहे. यात शरीर पूर्णपणे झाकलेलं असतं. याचं डिझाइन मुळात ऑस्ट्रेलियातील अहेडा जनेटीने तयार केलं आहे. हे बिकीनीचं वेगळं रूप आहे. याचा कपडा हलका असतो, त्यामुळे स्वीमिंग करतानाही याने अडचण येत नाही.
आपल्या स्वीमिंग सूट एडिशनमुळे हलिमा चांगलीच उत्साही आहे. केनियाच्या रिफ्यूजी कॅम्पमध्ये जन्माला आलेली हलिमा ६ वर्षांची असताना अमेरिकेत आली होती. हलिमाचं शिक्षण मिनेसोटामध्ये पूर्ण झालं. २०१६ मध्ये 'मिस मिनेसोटा अमेरिका' स्पर्धेत सेमी-फायनलिस्ट झाल्यावर ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. या स्पर्धेतील ती अशी पहिली स्पर्धक होती, जी हिजाब आणि बुर्किनी परिधान करून समोर आली होती.
त्यानंतर हलिमाचा खरा प्रवास सुरू झाला. २०१७ मध्ये हलिमाने न्यूयॉर्क फॅशन वीकमधून डेब्यू केलं. त्याच वर्षी ती मिस यूएस २०१७ साठी टेलीकास्ट आणि प्रीलिमिनरी जज सुद्धा झाली. आतापर्यंत तिने अनेक डिझायनर्ससाठी रॅम्पवॉक केला आहे. २०१७ मध्ये 'वोग अरेबिया'च्या कव्हर पेजवर झळकणारी हलिमा पहिली हिजाब परिधान करणारी मॉडेल ठरली. त्यानंतर ती 'ब्रिटीश वोग' कव्हर पेजवरही झळकली होती.
या ऐतिहासिक गोष्टीबाबत हलिमा सांगते की, 'जेव्हा मी आज स्वत:त त्या ६ वर्षांच्या मुलीला बघते, तेव्हा मला असं दिसतं की, याच देशात मी तेव्हा रिफ्यूजी कॅम्पमध्ये होते. अमेरिकी स्वप्नांसोबत मोठं होणं आणि परत येऊन केनियामध्ये मॅगझिनसाठी शूट करणं, मला नाही वाटत ही एक सामान्य कहाणी आहे'.