Mehrangarh fort : सध्या ऐतिहासिक सिनेमांची चांगलीच क्रेझ वाढत आहे. 'बाजीराव-मस्तानी', 'पद्मावत', मणिकर्णिका', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हे सिनेमे त्यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत होते. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी यातील लोकेशनची चांगलीच चर्चा झाली. या सिनेमाचं शूटिंग राजस्थानमधील भव्य मेहरानगढ या किल्ल्यात झालं. त्यामुळे या किल्ल्याबद्दलची उत्सुकता आणखीन वाढली आहे. चला जाणून घेऊ या किल्ल्याची खासियत..
या किल्ल्याच्या भींती १० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आहेत. यांची उंची २० फूट ते १२० फूट तर रुंदी १२ फूट ते ७० फूट इतकी आहे. या किल्ल्यातील रस्ते वळणादार असल्याने वेगळाच आनंद मिळतो. तसेच या किल्ल्याला चार दरवाजे आहेत. या किल्ल्याच्या आत अनेक भव्य महाल असून त्यावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे.
जोधपूरचे शासक राव जोधा यांनी १२ मे १४५९ मध्ये किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं होतं. आणि महाराज जसवंत सिंह यांनी १६३८ ते ७८ दरम्यान या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. म्हणजे या किल्ल्याचा इतिहास हा ५०० वर्ष जुना आहे.
किल्ल्याहून दिसतो पाकिस्तान
१९६५ मध्ये भारत-पाक युद्धावेळी सर्वातआधी मेहरानगढाला टार्गेट केलं गेलं होतं. पण किल्ल्याचं काही नुकसान झालं नाही. या किल्ल्याच्या टोकावरून पाकिस्तानची सीमा बघायला मिळते. इथे अनेक लोक किल्ल्याच्या टोकावर जाऊन पाकिस्तानची सीमा बघण्यासाठी अधिक उत्सुक असतात.
कसे पोहोचाल?
तुम्ही जर विमानाने जाणार असाल तर जोधपूर एअरपोर्ट तुमच्यासाठी सोपं पडेल. तर रेल्वे जाणार असाल तर जोधपूर रेल्वे स्टेशनवरून मुख्य शहारासाठी टॅक्सी किंवा बसेस सहज मिळतात. दिल्ली आणि आग्र्याहून जयपूरसाठी थेट बसेसही मिळतात.
कधी जाल?
मेहरानगढ किल्ला बघण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वाच चांगला कालावधी मानला जातो.