पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद झाल्यानंतर नातं तुटतं. ते अनेकदा घटस्फोटाचा निर्णय घेतात. पण घटस्फोटानंतर आपल्या उत्पन्नाचा आणि संपत्तीचा भाग हा पती पत्नीला देऊ इच्छित नसतात, असं अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार - अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला घटस्फोटानंतर फुटकी कवडीही मिळू नये म्हणून पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे.
इंग्लंडमधील सँडविचमध्ये ही घटना घडली आहे. येथे ब्रिटीश करोडपती आणि प्रोफेशनल गोल्फर फ्रान्सिस मॅकगिरिक यांनी स्वतःच्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या घराला आग लावली आहे. घटस्फोटानंतर पत्नीला घर किंवा त्यातील हिस्सा मिळू नये म्हणून त्यांनी हे सर्व केलं. हे असं असूनही, फ्रान्सिस जेलमध्ये जाण्यापासून थोडक्यात वाचले आहेत.
५० वर्षीय फ्रान्सिस यांच्यावर सँडविचमधील £९००,००० ($१.४ मिलियन - ११.६८ कोटी) घराला आग लावण्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी २५ जून रोजी घरी कोणी नसताना त्याने हे केलं. यानंतर त्याने पत्नीला मेसेज केला की, तो घराला आग लावणार आहे. मात्र, त्याने घराला आग लावल्यानंतर शेजाऱ्यांनी वेळीच आपत्कालीन सेवा बोलावल्याने घराचे मोठं नुकसान होण्यापासून वाचलं.
कॅरोलिन नाइट यांनी कोर्टाला सांगितलं की, घटनेच्या वेळी त्या व्यक्तीची पत्नी सारा एका डिनर पार्टीला गेली होती. फ्रान्सिस यांनी प्रथम कुकिंग ऑईलचा वापर करून आग लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही फायदा झाला नाही तेव्हा त्यांनी लिविंग रुमधील उशांना लायटरने आग लावली. ते साराला सतत मेसेज करत होते - "मी घराला आग लावली आहे. मी पाळीव कुत्रा डॉलीला खिडकीबाहेर फेकून देणार आहे."
जेव्हा फायर फायटर्स घटनास्थळी पोहोचले तेव्हा घर जळत होतं. त्यांनी फ्रान्सिस यांना घराबाहेर विचित्रप्रकारे वागताना पाहिलं. त्यांना किरकोळ भाजलं होतं. पण उपचार घेण्यासही त्यांनी नकार दिला. फ्रान्सिस यांनी आपल्या पत्नीला शेजाऱ्यांसमोर शिवीगाळ केली आणि सांगितलं की तिला ही संपत्ती कधीच मिळू नये अशी माझी इच्छा आहे.