नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक जण घरी बसून आहेत. अनेकांनी या रिकाम्या वेळेत नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. आपल्या कलागुणांना वाव दिला तसेच छंद जोपासला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने भन्नाट कल्पना आणि जबरदस्त कलाकृती समोर येत आहेत. वेगवेगळ्या गोष्टींची माहिती मिळत आहे. लॉकडाऊनमधला रिकामा वेळ एका व्यक्तीने सत्कारणी लावून कमाल केली आहे.
तांदूळ, पेन्सिलचं टोक, नारळ यांच्यावर सुंदर कालकृती केलेल्या याआधी अनेकांनी पाहिल्या आहेत. मात्र आता छोट्याशा सुपारीवर जबरदस्त, शानदार कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. गुजरातच्या सूरतमध्ये पवन शर्मा यांनी लॉकडाऊनमध्ये सुपारीवर आपलं कौशल्य दाखवलं आहे. राम मंदिर, श्री गणेश, पंतप्रधान नरेंद्र मोदींची कलाकृती तयार केल्या आहेत. यासोबतच अगदी चहाच्या कपाच्या कलाकृतीपासून नावांपर्यंत सुपारीवर उत्कृष्ट पद्धतीने कोरीव काम केलं आहे.
पवन यांनी 2021 नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास सुपारीपासून हॅपी न्यू इयर तयार केलं आहे. पवन शर्मा यांनी सुपारीवर आतापर्यंत जवळपास 60 कलाकृती तयार केल्या आहेत. त्यांच्या या कलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. उत्कृष्ट कलाकृती पाहून सर्वांनीच भरभरून कौतुक केलं आहे. अवघ्या काही मिनिटांत पवन सुपारीवर सुंदर कलाकृती साकारतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.