मृत्यू हा अटळ आहे. ज्याला जीवन मिळालं तो कधीना कधी या विश्वातून जाणार. पण मृत्यूबाबत अशाही घटना घडतात ज्या हैराण करून सोडतात. ऑस्ट्रेलियामधून अशीच एक घटना समोर आली आहे. 57 वर्षीय फिटनेस ट्रेनर फिल जेबल 28 मिनिटांसाठी मृत झाले होते.
त्यांना हार्ट अटॅक आल्यानंतर टेक्निकली डेड घोषित करण्यात आलं होतं. त्यांना एका बास्केटबॉस खेळादरम्यान अटॅक आला होता. यावेळी त्यांना असा अनुभव आला की, ते त्यांच्या शरीरातून बाहेर आले आणि उंचीवरून स्वत:ला बघत आहेत.
फिल यांनी स्वत:ला मिरॅकल मॅन म्हटलं आहे. ते म्हणाले की, 'मी कुठेही जाणार नाहीये'. ते एक मार्शल आर्ट ट्रेनर सुद्धा आहेत. नोव्हेंबरमध्ये ते अचानक पडले आणि त्यांना अटॅक आला होता.
त्यांचा मुलगा जोशुआने मदतीसाठी ऑफ ड्युटी नर्सला फोन लावला. जेणेकरून सीपीआर देता येईल. फिल यांना थेट हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे ते तीन दिवस बेशुद्ध होते. त्यांची सर्जरी करण्यात आली. जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की, ते 28 मिनिटांसाठी टेक्निकली डेड होते.
फिलने सांगितलं की, ते त्यांच्या जीवनाचं श्रेय बास्केटबॉस आणि आपल्या फॅन्सना देतात. बरेच लोक त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या मदतीसाठी उपस्थित होते. तीन मुलांचे वडील फिल यांना एक आठवड्यानंतर हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं.
आता त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे, 'हे सगळं तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. माझ्या पुस्तकांमध्ये एक मुख्य एलिमेंट आहे. हार्ड फिजिकल ट्रेनिंग. सगळ्यांसाठीच'. फिल म्हणाले की, मृत्यूच्या दारातून परत आल्यानंतर जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे आणि ते खेळातून रिटायर होण्याच्या आपल्या निर्णयाबाबत पुन्हा विचार करणार आहेत.
ते म्हणाले की, 'ज्या छोट्या छोट्या गोष्टींची आपण चिंता करतो, ते त्याच्या लायक नाहीत. कुणालाही असं म्हणू देऊ नका की, तुम्ही हे करू शकत नाही'. फिल यांना आशा आहे की, त्यांची कहाणी लोकांसाठी प्रेरणा बनेल. त्यांनी लोकांना सीपीआर शिकण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून तुम्ही कुणाचाही जीव वाचवू शकाल.