लोकं जेव्हा मृत्यूमुखी पडतात तेव्हा धार्मिक विधीप्रमाणे त्यांना दफन किंवा दहन केले जाते. अशीच एक महिला रोसांगेला अल्मेडा हिचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाने मृतदेह ताबूतमध्ये ठेवून दफन केला. त्यावर पूर्णत: प्लास्टरही केले. महिलेला दफन करून ११ दिवस झाले होते. परंतु जेव्हा कब्रस्तानातील लोकांनी कबरीतून आवाज येत असल्याचं सांगितले ते ऐकून कुटुंबालाही धक्का बसला.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार कबरीतून आवाज येत असल्याने अखेर ती कबर तोडली. त्या कबरीतून जे बाहेर आले ते पाहून सर्वच हैराण झाले. रोसांगेलाची जी अवस्था होती ती पाहून तिला चुकीने जिवंतच दफन केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, ११ दिवस ही महिला ताबूतमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली होती. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती बाहेर पडण्यासाठी ओरडत होती. ३७ वर्षीय रोसांगेला अल्मेडा बाहेर येण्यासाठी संघर्ष करत होती. त्यावेळी तिच्या मनगटांना जखमा झाल्या. जेव्हा कबर खोलून तिला बाहेर काढले तेव्हा ताबूतमध्ये रक्त आढळले.
समोर आलेल्या व्हिडिओत महिलेला ताबूतमधून बाहेर काढण्यात येत आहे. काही लोक रुग्णवाहिका बोलवा असं ओरडत असतात तर काहीजण महिलेच्या पायाला हात लावतात आणि ती किती गरम झालीय ते सांगतात. लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले परंतु दुर्देवाने ती बचावली नाही. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा महिलेला दफन करण्यात आले.
कब्रस्तानाशेजारी राहणारे लोक सांगतात की, रोसांगेला हिला दफन केल्याच्या ११ दिवसानंतर कबरीतून आवाज ऐकायला मिळत होता. हा आवाज ऐकून अनेकांनी भयभीत वाटायचे. हा प्रकार त्यांनी रोसांगेलाच्या कुटुंबाला सांगण्यात आला. त्यानंतर कुटुंबाने कबर तोडून आतमधील ताबूत बाहेर काढले तेव्हा महिलेच्या हाताला, मनगटाला जखमा झाल्या होत्या. ही महिला ताबूतमधून बाहेर येण्यासाठी संघर्ष करत होती असं दिसून येते. इतकेच नाही तर महिलेच्या कान, नाक इथे असलेला कापूसही शरीराच्या बाहेर ताबूतमध्ये पडला होता.