जगात टॅटू बनवण्याची प्रथा नवीन नाही. आजकाल लोक अधिक मॉडर्न बनत आहेत आणि टॅटूमुळे त्यांचा लूकही अधिक बदलत आहे. पूर्वी टॅटू असण्याला कारण असायचं, आज टॅटू केवळ शौक किंवा स्टाइल स्टेटमेंटसाठी काढतात. आज आम्ही तुम्हाला अशा जमातीबाबत सांगणार आहोत, ज्यांच्यासाठी टॅटू सुरक्षित राहण्याचं एक माध्यम होतं. म्यांमारच्या या जमातीत महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत आणि यामागचं कारण असं आहे ज्याबाबत वाचून तुम्ही हैराण व्हाल.
पश्चिम म्यांमारमध्ये चिन राज्य आहे आणि इथे राहणाऱ्या लाई तू चिन जमातीतील महिला जगभरात प्रसिद्ध आहेत. कारण या महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू आहेत. तुम्ही म्हणाल की, यात काय हैराण व्हायचं? आज देश-विदेशा महिला फॅशनसाठी चेहऱ्यापासून ते शरीराच्या इतर अवयवांवरही टॅटू काढतात. इतकंच काय तर अनेक महिलांनी तर संपूर्ण शरीरावर टॅटू बनवण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. पण येथील महिलांचं टॅटू काढण्याचं कारण हैराण करणारं आहे.
या कारणाने महिलांच्या चेहऱ्यावर बनवतात टॅटू
चिन लोकांच्या मान्यतांनुसार, एकदा एक बर्माचा राजा या भागात आला होता. त्याला येथील महिला फार आकर्षक वाटल्या. त्यामुळे त्याने एका महिलेला आपली राणी बनवण्यासाठी पळवून नेलं. या घटनेमुळे चिन लोक घाबरले आणि त्यांनी आपल्या मुलींच्या चेहऱ्यावर टॅटू बनवले. तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे.
एका दुसऱ्या मान्यतेनुसार, येथील महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू बनवले जातात, कारण त्या सुंदर दिसाव्या आणि ते या भागातील दुसऱ्या जमातीच्या लोकांपेक्षा वेगळ्या दिसाव्या. त्यांचं मत होतं की, वेगळ्या दिसत असल्याने दुसऱ्या जमातीचे लोक दुसऱ्या गावातील महिलांना पळवून नेणार नाहीत.
१९६० मध्ये टॅटूवर बॅन
चेहऱ्यावर टॅटू बनवण्याला अमानवीय घोषित करत यावर १९६० मध्ये बर्माच्या सोशलिस्ट सरकारने बॅन केलं होतं. त्यामुळे त्याआधीच्या महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू दिसतात. सध्या या भागात टॅटू असलेली वयोवृद्धी पीढी अखेरची पीढी आहे. यानंतर ही प्रथा येथून पूर्णपणे गायब होणार आहे.