नवी दिल्ली-
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियात चांगलेच सक्रिय आहेत. समाजातील विविध घटनांची आणि हरहुन्नरी तरुणाईच्या आविष्कारांची ते आवर्जून दखल घेत असतात. आनंद महिंद्रा जे ट्विट करतात ते प्रचंड व्हायरल होत असतं आणि देशातील तरुणाईला प्रोत्साहन देण्याच्या महिंद्रांच्या भूमिकेचंही देशभरातून कौतुक केलं जातं. आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी असाच एक व्हायरल व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांनी आज एका मोबाइल मॅरेज हॉल ट्रॅकचा व्हिडिओ शेअर केला आहे आणि असा आगळावेगळा ट्रॅक साकारणाऱ्या व्यक्तीची भेट घेण्याचीही इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
व्हिडिओत नेमकं काय?आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत एक भला मोठा ट्रक दिसतो. या ट्रॅकचं रुपांतर अत्यंत हुशारीनं चालत्या-फिरत्या मॅरेज हॉलमध्ये करण्यात आलं आहे. ट्रॅक पूर्णपणे ओपन झाला की तो अगदी लग्न समारंभाच्या सभागृहात बदलतो. ट्रक एका जागी थांबला की त्याचा मागील भाग खुला होतो आणि त्यातील काही लोक फ्रेम्स सेट करु लागतात.
इंटीरिअरवर आनंद महिंद्रा झाले फिदाफोल्डेड पार्ट्स सेट केल्यानंतर तुम्हाला अगदी आकर्षक फॉल सिलिंगसह एक एसी हॉल दिसतो. यात वऱ्हाडी मंडळींना बसण्यासाठी खुर्च्या. तर वधू-वरासाठी राजा-राणी खूर्ची इत्यादी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. महत्वाची बाब म्हणजे या चालत्या-फिरत्या हॉलमध्ये एकावेळी जवळपास २०० पाहुणे मंडळी उपस्थित राहू शकतात. या व्हिडिओमध्ये हॉलमध्ये एक सन्मान सोहळा आणि लग्न सोहळा संपन्न होतानाचे क्षणही दाखवण्यात आले आहेत. आनंद महिंद्रा यांनी या व्हिडिओचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
आनंद महिंद्रांनी व्यक्त केली भेटीची इच्छाआनंद महिंद्रा यांनी या अनोख्या मॅरेज हॉलची निर्मिती करणाऱ्याची भेट घेण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. "मला या क्रिएटीव्ह आणि संकल्पनेचा शिल्पकार कोण आहे त्यास भेटण्याची इच्छा आहे. अत्यंत हुशारीनं ही कलाकृती साकारण्यात आली आहे. ही सुविधा केवळ गावाखेड्यातील नागरिकांना तर उपयोगी येईलच पण यातून पर्यावरणाला अनुकूल सोहळे होतील. कारण आपल्यासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशात यासाठी जागेचा प्रश्न निर्माण होणार नाही" असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे.