असं म्हणतात की तुम्हाला जर एखाद्याने मदत केली तर ती तुम्ही कधीच विसरता कामा नये. यालाच आपण खाल्ल्या मिठाला जागणं किंवा उपकाराची जाण असणं असं म्हणतो. मोठ्या सहजतेने आपण थँक्यू म्हणून मदतीची जाण ठेवतो. मात्र आता तर प्राणीसुद्धा माणसाचे उपकार किंवा मदत विसरत नाहीत. त्याचं झालं असं की एका व्यक्तीने एका माकडाला संत्री खायला दिली. ही संत्री त्या व्यक्तीकडून स्वीकारताच त्या माकडाने अशारितीने थँक्यू म्हटलंय की तुमच्या तोंडूनही आपसुकच वाह...क्या बात..क्या बात हे शब्द बाहेर पडतील.
पुनित अग्रवाल नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘हे सुंदर आणि स्मित हास्य आभार मानण्यासाठी होतं’ अशी प्रतिक्रियासुद्धा अग्रवाल यांनी पोस्ट केली. यापैकी एका फोटोत माकडाला संत्री दिली जात आहे. दुसऱ्या फोटोत माकड संत्री देणाऱ्याकडे पाहून हसत हसत थँक्यू म्हणत आहे. सोशल मीडियावर हे फोटो ट्रेंडिंग होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीला पात्र ठरत आहेत.
हे फोटो पाहून नेटकरी जणू काही त्या माकडाच्या प्रेमातच पडले आहेत. नेटकऱ्यांकडून त्यावर विविध कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. “लाखो करोडोंचं हे हास्य सगळ्यांवर भारी पडेल. खरं तर हे फोटो पुलित्झर पुरस्काराचे मानकरी आहेत” अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे.
याशिवाय दिल खुश हो गया, क्यूटेस्ट, वाह काय स्माइल, सुपरडुपर अशी एक ना अनेक विशेषणं कमी पडावीत अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिल्यात. काहींनी माकडांना अशाचप्रकारे मदत केल्याचे फोटोही शेअर केले आहेत.
सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वर्दळ नाही. अशातच वन्यजीव आणि प्राण्यांचे खाण्यासाठी हाल होत आहेत. काही वन्यप्रेमी आपापल्या परीने या मुक्या जीवांची भूक भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच भुकेल्या माकडाला संत्री देऊन भूक भागवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या माकडानेही केलेल्या उपकाराची जाण ठेवत अनोख्या पद्धतीने थँक्यू म्हटलं आणि साऱ्यांची मनं जिंकली.