Most Expensive Wedding In World :अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट उद्या(दि. 12) लग्नबंधनात अडकणार आहेत. या शाही सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू आहे. बऱ्याच दिवसांपासून लग्नाशी संबंधित विविध कार्यक्रम होत आहेत. सोशल मीडियावर तर या लग्नाची बरीच चर्चा सुरू आहे. खासकरुन या लग्नाच्या खर्चाबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, या लग्नापेक्षाही महागडे लग्न यापूर्वी झाले आहे. विशेष म्हणजे, जगातील सर्वात महागड्या लग्नाचा विक्रमही एका भारतीयाच्या नावावर आहे.
आतापर्यंत जगभरात अनेक महागडे लग्नसोहळे झाले आहेत. काही रिपोर्ट्सनुसार, प्रिन्स चार्ल्स आणि डायनाच्या लग्नाला जगातील सर्वात महागडे लग्न म्हटले जाते. या लग्नात 110 मिलियन डॉलर्स खर्च झाल्याचे सांगण्यात येते. याशिवाय, काही रिपोर्ट्समध्ये, रशियाच्या सैद गुत्सेरिव्ह आणि खादिजा उझाखोव्ह यांच्या लग्नाला जगातील सर्वात महागडे लग्न म्हटले जाते. पण, अधिकृत घोषणा आणि लग्नावर झालेल्या एकूण खर्चाची अधिकृत माहिती नसल्याने जगातील सर्वात महागडे लग्न कोणते, हे स्पष्टपणे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत जगातील सर्वात महागडे लग्न कोणते असा प्रश्न पडतो.
जगातील सर्वात महाग लग्न कोणते ?गिनीज बुक रेकॉर्डद्वारे जाणून घेऊ की, कोणत्या लग्नाला सर्वात जास्त खर्च आला? गिनीज बुकनुसार जगातील सर्वात महागडे लग्न एका भारतीयाने केले आहे. जगातील सर्वात महागड्या लग्नाचा विक्रम स्टील किंग लक्ष्मी निवास मित्तल यांची मुलगी, वनिषा मित्तल हिच्या नावावर आहे. वनिषा मित्तलने 2004 मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर अमित भाटियाशी लग्न केले होते. हा विवाह फ्रान्समध्ये झाला होता.
किती खर्च झाला?गिनीज बुकनुसार, लक्ष्मी निवास मित्तल यांच्या मुलीच्या लग्नाचे कार्यक्रम 6 दिवस चालले. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे हा विवाहसोहळा पॅलेस ऑफ व्हर्सायमध्ये आयोजित करण्यात आला होता. आजपर्यंत या पॅलेसमध्ये आयोजित केलेला हा एकमेव खाजगी कार्यक्रम असल्याचे सांगितले जाते. या लग्नात अनेक परदेशी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी परफॉर्म केले. रिपोर्टनुसार, या लग्नात 55 मिलियन डॉलर्स खर्च करण्यात आले होते. भारतीय चलनात सांगायचे झाले तर, त्या लग्नावर सुमारे 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. आज तुम्हाला ही रक्कम फार वाटत नसेल, पण 20 वर्षांपूर्वी ही रक्कम खुप जास्त होती.