हेडिंग वाचून आश्चर्यचकित झालात ना?, मानवी दुधाचे दागिने हे काय नवीनच असं वाटलं असेल ना? पण हे खरं आहे. युनायटेड किंग्डममध्ये मॅजेंटा फ्लॉवर्स (Magenta Flowers) नावाची एक कंपनी असे दागिने घडवते आणि त्याद्वारे कोट्यावधींची कमाईसुद्धा करते. ही संकल्पना नेमकी काय आहे ते जाणून घेऊया.
मूल होणं हा बहुतांश घरांसाठी एक कौतुकसोहळाच असतो. आपल्या मुलाच्या सगळ्याच लहानपणच्या आठवणी जपाव्यात असं पालकांना वाटतं. कुणी फोटोंद्वारे त्या जपतं तर कुणी व्हिडिओ करून ठेवतं, कुणी मुलांची खेळणी, कपडे जपून ठेवतात. अशाचप्रकारे काही महिला बाळाला दिलं जाणारं स्तन्य अर्थात आईचं दूध साठवून ठेऊन त्यापासून दागिने बनवून घेतात. कारण बाळ आणि आई यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे स्तनपान असतं. पण अशाप्रकारे मानवी दुधापासून दागिने बनवणं, हे काही जणांना विचित्र वाटू शकतं.
युनायटेड किंग्डममध्ये (United Kingdom) सफिया आणि अॅडम रियाध (Safiyaa And Adam Riyadh) या जोडगोळीने मॅजेंटा फ्लॉवर्स (Magenta Flowers) नावाची एक कंपनी सुरू केली, जी हाच व्यवसाय करते. कुणालाही हे दागिने बनवून घ्यायचे असतील तर त्यासाठी किमान ३० मिलिलीटर मानवी दुधाची आवश्यकता असते. यापासून हार, अंगठ्या, कानातले आदी दागिने बनवले जातात. मॅजेंटा फ्लॉवर्सच्या दाव्यानुसार हे दागिने वर्षानुवर्षं टिकतात आणि आपला रंगसुद्धा टिकवून ठेवतात. कुणी या दागिन्यांत आपल्या मुलांचं नाव गुंफतात तर कुणी रत्न जडवतात.
लोकांना अत्यंत आश्चर्यजनक काहीवेळा खोटाच वाटू शकणारा हा व्यवसाय कमाई मात्र उत्तम करत आहे. 2019 साली सफिया आणि अॅडम रियाध दोघांनी मॅजेंटा फ्लॉवर्सची स्थापना केली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास तीन वर्षांच्या कालखंडात त्यांनी सुमारे चार हजारांवर ऑर्डर्स घेऊन दागिने घडवून दिले आहेत. लोकांमध्ये अशाप्रकारे मानवी दुधापासून दागिने घडवण्याची आवड वाढते आहे. त्यामुळे मॅजेंटा फ्लॉवर्सला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. म्हणूनच 2023पर्यंत ही कंपनी जवळपास 15 कोटींची भरारी घेईल, अशी अपेक्षा आहे.
आई म्हणून बाळाच्या प्रत्येक गोष्टीचं किती महत्त्व असतं ते सफियाला चांगलंच माहिती आहे, कारण ती स्वत: तीन मुलांची आई आहे. ती म्हणते, ‘स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये एक खास बंध तयार होतो जो त्यांच्या नात्याची सकारात्मक सुरूवात करतो. त्यामुळेच त्या रेशमी बंधाला जपून ठेवण्याचा मॅजेंटा फ्लॉवर्सचा प्रयत्न असतो.’