कानपूर – भारतीय रेल्वे नेहमी प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असते. तुमच्या सेवेत सदैव तत्पर हे स्लोगन भारतीय रेल्वेने प्रत्यक्षात खरं करुन दाखवलं आहे. एक ट्रेन मुंबईहून सुलतानपूरला जात होती त्यात अंजली नावाची महिला तिच्या चिमुकल्यासह प्रवास करत होती. या महिलेला आलेल्या समस्येबाबत तिने रेल्वेला ट्विट करत माहिती दिली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याची दखल घेतली.
ही महिला तिच्या लहान बाळासह प्रवास करत होती. प्रवासात बाळाला भूक लागली होती. मात्र महिलेकडे गायीचं दूध नव्हतं. अखेर या महिलेने ट्विट करत म्हटलं की, मी प्रत्येक स्टेशनवर गायीचं दूध विचारणा केली परंतु मला ते सापडलं नाही. त्यासाठी मी विनंती करते की कृपया शक्य झाल्यास माझ्या लहान मुलासाठी गायीचं दूध उपलब्ध करुन द्यावे. अशी विनंती करणारं ट्विट महिलेने केले.
या महिलेला प्रवासात येणारी अडचण पाहून रेल्वेनेही तात्काळ जेव्हा ट्रेन कानपूर जंक्शनला पोहचली तेव्हा अधिकाऱ्यांनी महिलेची मागणी पूर्ण केली. या महिलेने रेल्वे मंत्रालयाला टॅग करत ट्विट केले होते. तेव्हा तातडीने हे ट्विट कानपूर सेन्ट्रलचे संचालक हिमांशु शेखर उपाध्याय यांना पाठवून सूचित करण्यात आले. तब्येत ठीक नसल्याने हिमांशु शेखर घरीच होते. परंतु ट्विट मिळताच त्यांनी रेल्वे टीमला सक्रीय केले.
त्यानंतर जेव्हा महिला प्रवास करत असणारी ट्रेन कानपूर स्टेशनला पोहचली तेव्हा अंजलीला गायीचं दूध पाहून सुरुवातीला विश्वास बसला नाही. रेल्वे अधिकारी स्वत: हे दूध घेऊन महिलेच्या प्रतिक्षेत होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी अवघ्या २३ मिनिटांत महिलेच्या बाळाला गायीचं दूध उपलब्ध करुन दिले. या घटनेने महिला भारावली होती. त्यानंतर जेव्हा ही महिला सुलतानपूरला तिच्या गावात पोहचली. तिने रेल्वे अधिकाऱ्यांना फोन करुन धन्यवाद दिले.
या घटनेवर कानपूर सेंट्रलचे संचालक हिमांशु शेखर उपाध्याय म्हणाले की, ही महिला तिच्या लहान बाळासह एकटी प्रवास करत होती. त्यावेळी तिची मदत करणं गरजेचे होते. आम्हालाही या महिला रेल्वे प्रवाशाची मदत करुन आनंद झाला. रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तयार आहोत असंही त्यांनी सांगितले.