ऑनलाइन लोकमत
अलीगढ, दि. २७ - मदरसे हे समलैंगिकाचे अड्डे बनले असून यावर बंदी घातल्याशिवाय मुस्लीम तरुणांचे भविष्य सुधरु शकणार नाही असे वादग्रस्त विधान अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे प्राध्यापक वसीम राजा यांनी केले आहे. राजा यांच्या विधानावर स्थानिक विद्यार्थी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या तीन दशकांपासून अलीगढ विद्यापीठात इतिहास शिकवणारे वसीम राजा यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात वादग्रस्त मेसेज पाठवला होता. यात त्यांनी मदरशांना समलैगिंकाचे अड्डे म्हटले होते. मदरशांमध्ये समलैंगिकतेचा बोलबाला असून मौलानाही यात सहभागी असतात असा गंभीर आरोप त्यांनी वॉट्स अॅपवरील ग्रुपमध्ये केला होता. राजा यांच्या या विधानावर विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केले असून राजा यांनी आपण असे विधान केलेच नाही असे म्हटले आहे. माझा मोबाईल हॅक झाला होता व त्याद्वारे हा मेसेज टाकण्यात आला होता असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. मात्र विद्यार्थ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. वसीम राजा याना त्यांचे म्हणणे मांडू शकतात, पण कोणत्याही पुराव्याविना ते असे गंभीर आरोप करु शकत नाही असे एका विद्यार्थ्याने सांगितले. तर हा विद्यापीठाची बदनामी करण्याचा प्रकार आहे असा आरोप दुस-या विद्यार्थ्याने केला आहे. वसीम राजा यांना विचारपूर्वक विधान करणे गरजेचे होते असे विद्यापीठाच्या सचिवांनी म्हटले आहे.