Mount Everest: जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. तुम्हाला हे ऐकायला खूप विचित्र वाटेल पण, माउंट एव्हरेस्टची उंची वाढत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची उंची वाढण्याचे कारण म्हणजे एक नदी आहे. माउंट एव्हरेस्टची सध्याची उंची सुमारे 8849 मीटर आहे, तर 2005 मध्ये जेव्हा त्याची उंची मोजली गेली तेव्हा ती 8844 मीटर होती. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या एका संशोधनात त्याची उंची वाढण्यामागे एक महत्त्वाचा घटक समोर आला आहे.
माउंट एव्हरेस्टची उंची दरवर्षी वाढत आहे!या संशोधनानुसार, माउंट एव्हरेस्टपासून 75 किलोमीटर दूर वाहणाऱ्या अरुण नदीमुळे सुमारे 89000 वर्षांत या पर्वताची उंची 15 ते 50 मीटरने वाढली आहे. नदीच्या भूपातळीतील बदलांमुळे एव्हरेस्टची उंची दरवर्षी 2 मिलिमीटरने वाढत आहे. जीपीएस उपकरणांच्या मदतीने हा बदल स्पष्टपणे पाहिला जाऊ शकतो.
नदीमुळे माउंट एव्हरेस्टची कशी वाढते?हिमालयाची निर्मिती लाखो वर्षांपूर्वी भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या टक्कर (भूकंप) मुळे झाली होती. आतापर्यंत टेक्टोनिक प्लेट्सचे घर्षण हे तिची उंची वाढण्यामागे मुख्य कारण मानले जात होते.
पण युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधनात एक अनोखा पैलू समोर आला आहे. संशोधनानुसार, अरुण नदी जेव्हा हिमालयातून खाली वाहते तेव्हा, ती खूप कचरा आणते. हा ढिगारा पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर एक थर तयार करतो, ज्यामुळे पृथ्वीच्या खालच्या थरावरील दाब कमी होतो. त्यामुळे हा पातळ थर अरुण नदीबरोबर वाहू लागतो.
या संशोधनात सहभागी असलेले ॲडम स्मित सांगतात की, ही प्रक्रिया अशी आहे की, जर तुम्ही जहाजातून सामान फेकायला सुरुवात केली तर ते हलके होते. यामुळे जहाज पाण्यावर थोडे उंच तरंगू लागते. त्याचप्रमाणे, जेव्हा पृथ्वीखाली वाहणारी नदी ढिगारा वाहून नेते, तेव्हा पृथ्वीचे कवच वर येते. या प्रक्रियेला ‘आयसोस्टॅटिक रिबाउंड’ म्हणतात. संशोधकांच्या मते, यामुळेच माउंट एव्हरेस्टची उंची वाढत आहे.
माउंट एव्हरेस्टची उंची कोण मोजते?माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. त्याचे शिखर नेपाळच्या प्रदेशात येते आणि येथे ते सागरमाथा म्हणून ओळखले जाते. 2017 मध्ये नेपाळने जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजण्यास सुरुवात केली. कारण असे मानले जात होते की, 2015 च्या भूकंपानंतर त्याचा माउंट एव्हरेस्टवरही परिणाम झाला होता. यानंतर चीनही या कामात सामील झाला आणि सुमारे 2 वर्षांनी हे काम पूर्ण झाले. 2020 मध्ये चीन आणि नेपाळने संयुक्तपणे त्याची उंची मोजली आणि डेटा शेअर केला. या आकडेवारीनुसार माउंट एव्हरेस्टची उंची 8849 मीटरपर्यंत वाढली होती, तर 2005 मध्ये जेव्हा चीनने त्याची उंची मोजली तेव्हा त्याची उंची 8844.43 मीटर असल्याचे सांगण्यात आले होते.