दहावी आणि बारावी हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे आहेत. दहावी किंवा बारावीला चांगल्या मार्कांनी पास होऊन यश मिळवावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी गरीबीच्या परिस्थितीतून वाट काढत आपली स्वप्न पूर्ण केल्याची अनेक उदाहरण तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हुश्शार आणि होतकरू विद्यार्थीनीबद्दल सांगणार आहोत.
मध्य प्रदेशातील १२ वी बोर्डाचे निकाल जाहिर झाले आहेत. मध्यप्रदेशातील सुचीनुसार श्योपुरची रहिवासी असलेली मधु आर्य या मुलीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. मधुचे वडिल फुटपाथवर चपला विकण्याचं काम करतात. अत्यंत गरीब कुटुंबात वाढलेल्या मधुने १२ वीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवल्यामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मधुने बारावीच्या परिक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्यामुळे घरातील मंडळी आणि नातेवाईकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आता पुढील शिक्षण घेऊन मधुला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्यात रस असल्याचे मधूने सांगितले. मुलीच्या पुढील शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी सरकारकडे आर्थीक मदत देण्याबाबत विनंती केली आहे.
मधु आर्यही श्योपुरच्या गांधीनगर परिसरात राहते. तिच्या वडिलांचे नाव कन्हैया आर्य आहे. मधुने शालेय शिक्षण हे सरकारी शाळेतून घेतले. त्यानंतर मेहनत आणि जिद्दीने अभ्यास करत बारावीच्या परिक्षेत विज्ञान शाखेत राज्यातील पहिल्या १० मधून तिसरा क्रमांक पटकावला. मधुचे वडिल हे फुटपाथवर चप्पल विकून आपलं घर चालवतात.
मधु आर्यने ५०० पैकी ४८५ गुण मिळवत आपल्या कुटुंबाचं नाव मोठं केलं आहे. आपल्या या यशामागे आई वडिल आणि शिक्षकांचा मोठा हात असल्याचे मधुने सांगितले. जवळपास ७ ते ८ तास अभ्यास करून मधुने हे यश मिळवलं आहे. आता पुढील शिक्षणासाठी सरकारने मदत करायला हवी अशी विनंती मधुच्या वडिलांनी केली आहे. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनीही या मुलीला ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दालचिनीच्या सेवनाने होतात 'हे' ६ फायदे; कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास होईल मदत
जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला