धक्कादायक! उलट्या पायांसोबत जन्माला आली चिमुकली, आई-वडील हॉस्पिटलमध्ये सोडून फरार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 02:01 PM2021-06-23T14:01:53+5:302021-06-23T14:02:11+5:30
डॉक्टरही ही केस पाहून हैराण झाले असून ही केस दुर्मिळ असल्याचं ते म्हणाले. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे या चिमुकलीला जन्म देणारी माता तिला हॉस्पिटलमध्येच सोडून पळाली.
मध्य प्रदेशच्या हरदामध्ये गुडघ्यपासून उलट्या पायासोबत एका चिमुकलीने जन्म घेतल्याची घटना समोर आली आहे. हरदा जिल्हा हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या या चिमुकलीच्या दोन्ही पायांचे पंजे मागच्या दिशेने आहे. डॉक्टरही ही केस पाहून हैराण झाले असून ही केस दुर्मिळ असल्याचं ते म्हणाले. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे या चिमुकलीला जन्म देणारी माता तिला हॉस्पिटलमध्येच सोडून पळाली.
आई-वडील फरार
दैनिक भास्करच्या एका रिपोर्टनुसार, हरदा खिरकिया ब्लॉकच्या झांझरीमध्ये राहणाऱ्या विक्रमची पत्नी पप्पीची सोमवारी दुपारी १२ वाजता डिलेव्हरी झाली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. नॉर्मल डिलेव्हरीनंतर समजलं की, मुलीचे दोन्ही पाय उलटे आहेत. मुलीच्या जन्मानंतर तिला जन्म देणारी आई आणि तिचे वडील दोघेही बेपत्ता आहेत. ते दोघेही चिमुकलीला हॉस्पिटलमध्येच सोडून फरार झाले आहेत.
मुलीला पाहून हैराण झाले डॉक्टर
या मुलीला पाहून डॉक्टर आणि नर्स हैराण झाले आहेत. ही एक दुर्मिळ केस मानली जात आहे. मुलीचं वजनही सामान्यापेक्षा बरंच कमी आहे. साधारणपणे जन्मावेळी बाळाचं वजन २.७ किलो ते ३.२ किलो दरम्यान असतं. पण या मुलीचं वजन केवळ १.६ किलो इतकं आहे. सध्या ही मुलगी डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे आणि धोक्यातून बाहेर आहे.
बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सनी जुनेजा म्हणाले की, 'मी माझ्या ५ वर्षांच्या करिअरमद्ये आतापर्यंत अशी केस पाहिली नाही. मी या केसबाबत इंदुर आणि भोपाळच्या बालरोग आणि हाडांच्या तज्ज्ञांसोबत चर्चा केली. त्यांनी सुद्धा ही केस दुर्मिळ असल्याचं सांगितलं.
ऑपरेशन करून सरळ होऊ शकतात पाय
इंदुरच्या अरबिंदो हॉस्पिटलचे हाडांचे तज्ज्ञ डॉ. पुष्पवर्धन मंडलेचा यांनी सांगितलं की, 'ही एक दुर्मिळ केस आहे. लाखोंमध्ये अशी एक केस समोर येत असते. आईच्या गर्भात कमी जागा असल्याने किंवा आनुवांशिक कारणामुळे अशा केसेस समोर येतात. मुलीला पाहिल्यावरच काही सांगितलं जाऊ शकतं. कारण अशाप्रकारची केस मी आधी कधी पाहिली नाही. मात्र, ऑपरेशननंतर पाय सरळ केले जाऊ शकतात.