कोरोना व्हायरस अजूनही पूर्णपणे आपल्यातून गेलेला नाही. अशात कोविड गाइडलाईन्स डोळ्यांसमोर ठेवून जवळच्या आणि काही खास लोकांना लग्नात बोलवलं जातं. पण तुम्ही कधी ऐकलंय का की, लग्नात बोलवलं नाही म्हणून कुणी नवरदेवाला मारलं? अशी एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. लग्नाचं आमंत्रण मिळालं नाही म्हणून गावातील एका व्यक्तीने नवरदेवाला मारलं.
मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातील ही घटना आहे. इथे नवविवाहित तरूणाने पोलिसात तक्रार दिली की, लग्नात बोलवलं नाही म्हणून गावातीलच एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला मारहाण केली. रिपोर्टनुसार, ही घटना रविवारी रात्री चंदपुरा गावातील आहे. पोलिसांनी सोमवारी आरोपी नरेंद्र कुशवाह विरोधात गुन्हा दाखल केलाय.
देहात पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल राधेश्याम शर्मा यांनी सांगितलं की, '२२ वर्षीय पीडित नवरदेवाने आरोप लावला की, त्याने गावातील नरेंद्र कुशवाह याला आपल्या लग्नात बोलवलं नव्हतं. ज्यामुळे तो नाराज झाला आणि त्याने मारहाण केली. इतकंच नाही तर पीडितने त्या व्यक्तीला हेही सांगितलं की, कोविड गाइडलाईन्समुळे लग्नात केवळ घरातील सदस्यांना बोलवण्यात आलं होतं. पण नरेंद्र हे ऐकून संतापला आणि त्याने नवरदेवाला मारहाण केली.
इतकंच नाही तर लग्नात बोलवलं नाही म्हणून नाराज आरोपीने पीडित नवरदेवाकडे दारूसाठी ५०० रूपयांची मागणीही केली. यावर पीडितने त्याला १०० रूपये दिले. पण तो आणखी जास्त पैशांची मागणी करत नवरदेवाला मारत राहिला. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, पीडित कसातरी स्वत:ला वाचवून तेथून पळाला. पण यादरम्यान त्याला डोळ्याला आणि शरीराच्या काही भागावर जखमा झाल्या आहेत. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.