जे दगड वर्षानुवर्ष कुळदेवता म्हणून पूजले, ते निघाले डायनासॉरचे अंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 02:40 PM2023-12-20T14:40:30+5:302023-12-20T14:44:15+5:30
Dinosaur eggs : गावातील लोक ज्या दगडांची अनेक वर्षांपासून देवता मानून पूजा करत होते ते कोट्यावधी वर्षाआधीच्या डायनासॉरचे अंडे निघाले.
Dinosaur eggs : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील पाडलिया गावातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. गावातील लोक ज्या दगडांची अनेक वर्षांपासून देवता मानून पूजा करत होते ते कोट्यावधी वर्षाआधीच्या डायनासॉरचे अंडे निघाले. नर्मदा घटातील हा भाग कोट्यावधी वर्षाआधी डायनासॉर युगाशी जुळलेला आहे आणि इथे साधारण 6.5 कोटी वर्षाआधी डायनासॉर राहत होते. आता प्रशासन हालचाली करून अंड्याची चौकशी करत आहे.
स्थानिक डायनासॉर अभ्यासक विशाल वर्मा यांनी सांगितलं की, काही दिवसांआधी तीन वैज्ञानिकांचा वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता. या वर्कशॉपमध्ये वैज्ञानिक डॉ. महेश ठक्कर, डॉ. विवेक वी कपूर, डॉ. शिल्पा आल्या होत्या. हे सगळे मांडू येथील डायनासॉर फॉसिल्स पार्कच्या विकास कामांची माहिती घेण्यासाठीही आले होते.
यादरम्यान वैज्ञानिकांना आढळलं की, गावातील लोक साधारण 18 सेंटीमीटर व्यासाच्या गोल दगडांची पूजा करतात. गावातील एक व्यक्ती बेस्ता पटेल यांनी सांगितलं की, या गोल दगडांमध्ये त्यांचा देव काकर भैरव वास करतो. हा देव गावावर कोणतंही संकट येऊ देत नाही.
लखनौवरून आलेल्या वैज्ञानिकांच्या टिमने चौकशी केली तेव्हा समजलं की, पूजा केली जाणारे गोल दगड हे डायनासॉरचे अंडे आहेत. जाणकारांचं मत आहे की, या भागात डायनासॉरचे फॉसिल्स जागोजागी पसरलेले आहेत. मांडूमध्ये यामुळेच पार्क बनवला जात आहे. जेणेकरून फॉलिल्स संरक्षित करता यावेत.