एखाद्या समुद्रकिनारी फिरायला गेल्यानंतर त्याठिकाणी अनोखी वस्तू हाती लागल्यानंतर ती घरी आणणं एका महिलेला आणि तिच्या मुलीला महागात पडलं आहे. ब्रिटनच्या कॅटमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत जो प्रसंग घडला तो ऐकून तुम्हाला धक्का बसेल, आई आणि मुलगी समुद्रकिनारी भटकंती करत असताना त्याठिकाणी त्यांना दुसऱ्या महायुद्धातील ग्रेनेड सापडलं, हे ग्रेनेड घेऊन दोघी घरी आल्या आणि किचनमध्ये हे ग्रेनेड ठेवलं, तेव्हा ग्रेनेडचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत दोघीही सुखरूप बचावल्या.
३८ वर्षाची जोडी क्रूज आणि तिची ८ वर्षाची मुलगी इसाबेला या समुद्रकिनारी फिरायला गेल्या होत्या. तेव्हा किनाऱ्यावर आईलेकीला अजबगजब वस्तू सापडली, सुरुवातीला हा प्राचीन जीव किंवा कोणत्या प्राण्याची हाडे असेल असा अंदाज या दोघींना आला. मात्र प्रत्यक्षात ती वस्तू ८० वर्षापूर्वीचा ग्रेनेड असेल याची कल्पनाही त्यांना आली नाही. एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना जोडी क्रूज म्हणाली की, मी या वस्तूचा फोटो पुरातत्व विभागाच्या वेबसाईट आणि सोशल मीडियावर पोस्ट केला होता, जेणेकरून हे काय आहे याची माहिती मिळेल. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आल्या मात्र हे ग्रेनेड आहे याबाबत कोणीही माहिती दिली नाही.
तसेच ही वस्तू एखाद्या प्राण्याच्या हाडाप्रमाणे दिसत होती आणि जास्त वजनही नव्हतं. कुठेही ही वस्तू मेटलपासून बनलेली आहे असं दिसत नव्हतं. मी ते घरी आणलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर काही रिसर्च केल्यानंतर मी त्या वस्तूला पिन लावली, मी असं केल्यानंतर लगेच ग्रेनेडची एक बाजू पिघळण्यास सुरुवात झाली, त्यानंतर संपूर्ण वस्तू एका आगीच्या गोळ्याप्रमाणे झाली त्यातून धूर निघू लागला, आमच्या डायनिंग रूममध्ये सगळीकडे धूर झाला. माझी मुलगी जोरजोरात ओरडू लागली, मागच्या दरवाजाने ती घराबाहेर पडली आणि मी ती वस्तू जोरात किचनच्या दिशेने फेकली.
किचनमध्ये ही ग्रेनेड पडल्यानंतर त्याचा विस्फोट झाला, आम्ही खूप भाग्यवान होतो कारण हा ग्रेनेड खूप शक्तिशाली आणि धोकादायक असण्याची शक्यता होती, माझ्या डोक्यात सुरुवातीला विचार आला, माझ्या मुलीला, घराला, घरातील कुत्र्यांना, मांजरींना कसं वाचवायचं? माझी मुलगी गार्डनच्या दिशेने पळाली, मी मांजरींच्या मदतीसाठी पोहचली, नशीब बलवत्तर म्हणून आम्ही सगळे सुखरूप आहोत असं जोडी क्रूजने सांगितले.
जोडीच्या घरी आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सामान्यत: अशाप्रकारच्या ग्रेनेडवर सुरक्षित कोटिंग लावण्यात आलेलं असतं. या ग्रेनेडवरदेखील हे पाहायला मिळालं, या घटनेनंतर जोडीच्या मित्रपरिवाराने त्यांच्याकडून वचन घेतलं की यापुढे समुद्र किनाऱ्यावरील कोणतीही गोष्ट उचलून घरी आणणार नाही. कदाचित ८० वर्षापूर्वीचा ग्रेनेड वादळी वारा आणि समुद्रातील लाटांमुळे किनाऱ्यावर येऊन पोहचला असावा असं सांगितलं जात आहे.