Mumbai : निमंत्रण नसताना एका लग्नात जाणं एका तरूणाला चांगलंच महागात पडलं. पाहुण्यांनी पकडून त्याची अशी काही धुलाई केली की, तो आयुष्यभर लक्षात ठेवेल. इतकंच नाही तर ज्या स्कूटरने तो लग्नात आला होता ती सुद्धा कुणीतरी पळवली. तरूणाने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
मुंबईमधील ही घटना असून 13 जून ला गोरेगांवचा राहणारा 24 वर्षीय जावेद कुरेशी त्याचा 17 वर्षीय चुलत भाऊ आणि काही मित्रांसोबत बाहेर फिरायला निघाला होता. जेव्हा हे सगळे जोगेश्वरीला पोहोचले तेव्हा जावेदच्या चुलत भावाने एका हॉलकडे इशारा केला. जिथे लग्नाची पार्टी सुरू होती.
त्यानंतर सगळेचजण हॉलमध्ये शिरले आणि त्यांनी जेवण करायला सुरूवात केली. ते ना नवरीकडील ना नवरदेवाकडील कुणाला ओळखत होते. त्यांना निमंत्रणही नव्हतं. जेव्हा ते जेवण करत होते तेव्हा काही पाहुणे त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याशी बोलू लागले. कारण त्यांना या तरूणांवर संशय आला होता.
याप्रकरणी ओशिवारा पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जेव्हा काही पाहुण्यांच्या लक्षात आलं की, तरूण निमंत्रण नसताना लग्नात शिरले आहेत. तेव्हा आयोजक आक्रमक झाले. त्यांनी तरूणांना मारहाण केली. स्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच तरूण हॉलमधून बाहेर पडले. जेव्हा ते रस्त्यावर आले तेव्हा काही लोकांनी मध्यस्थी केली.
दरम्यान जावेदने गर्दीत उभ्या असलेल्या एका व्यक्तीकडे स्कूटरची चावी दिली आणि त्याला स्कूटर पार्किंगमधून आणण्याची विनंती केली. पण त्या व्यक्तीने स्कूटर जावेदला आणून देण्याऐवजी गाडी घेऊन फरार झाला. याबाबत जावेदने ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.