(Image Credit- Youtube)
कोरोना व्हायरसच्या माहामारीनं संपूर्ण जगावर प्रतिकुल परिणाम झालेला पाहायला मिळाला. कोरोना व्हायरसच्या संकटाचा जगभरातील अर्थव्यवस्थांवर जसा परिणाम झाला त्याचप्रमाणे सामान्य माणूस आणि त्याच्या नोकरीवरही गंभीर परिणाम झाला. अनेकांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं तर कोणाची पगार कपात करण्यात आली. पण अनेकांनी हार न मानता वेगवेगळे मार्ग शोधत पुन्हा आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि अनेकांचा हा प्रयत्न यशस्वीसुद्धा झाला. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुंबईच्या (Mumbai) शेफची कहाणी सांगणार आहोत
पंकज नेरूरकर हे मुंबईचे शेफ. काही काळ त्यांनी (Grand Hyatt) ग्रँड हयातसारख्या शहरातील पंचतारांकित हॉटेल्समध्ये काम केले. त्यानंतर, त्यांनी खडपे नावाचे खाद्यपदार्थ स्टॉल सुरू केले याद्वारे मालवणी खाद्यप्रकार लोकांना पुरवायला सुरूवात केली. कारण कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात शहरातील दोन रेस्टॉरंट्स बंद करण्यात आली. मुंबईतील प्रभादेवी येथील दोन रेस्टॉरंट्सना आर्थिक पेचप्रसंगामुळे बंद करावे लागले.
आपली नोकरी जाण्यानं कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये तसंच कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी या गृहस्थांनी शक्कल लढवली. त्यांनी आपल्या नॅनो कारमधून अस्सल महाराष्ट्रीयन जेवण शिजवायला आणि सर्व्ह करण्यास सुरवात केली. बेटर इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, ''मी त्यावेळी रोजगाराचा एकमेव स्त्रोत गमावला आणि भावाचीही नोकरी गेली होती. तेव्हा मनात अनेकदा नकारात्मक विचार येत होते. पण मागे न हटता मी माझ्या कारच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा विचार केला आणि त्यास नॅनो फूड असं नाव दिले. तसंच पोस्टर बनवले आणि बोर्डवर मेनू लिहून काढला.''
या उपक्रमाची सुरुवात सप्टेंबर २०२० मध्ये झाली. कारच्या बाहेर उभं राहून स्वयंपाकघरात अन्न शिजवले जात होतं. सुरूवातीला ग्राहकांचा कमी प्रतिसाद मिळाला पण हळूहळू मेन्यू आणि ग्राहकांची संख्याही वाढू लागली. या रूचकर आणि स्वादिष्ट मेन्यूमध्ये चिकन किंवा फिश थाली आणि सुरमई फ्राय, कोलंबी पुलाव, पोम्फ्रेट फ्राय, भाकरी इत्यादी इतर पदार्थांचा समावेश आहे. सकाळी न्याहारीसाठी सकाळी साडेसात वाजता आणि दुपारच्या जेवणासाठी साडे बारा वाजता, रात्रीच्या जेवणासाठी साडे रात वाजता इथे वेगवेगळे पदार्थ उपलब्ध असतात.
२१ मार्चला सगळ्यात मोठं उल्कापिंड येणार; पृथ्वीवर असा होईल परिणाम, NASAच्या तज्ज्ञांचा इशारा
जसजसे दिवस गेले तसतसे अधिक लोकांना या स्टॉलबाबत माहिती मिळू लागली. या उपक्रमासाठी पंकज यांना कॉलेजचे मित्र , श्रीकृष्ण गंगान यांनी पाठींबा आणि मार्गदर्शन दिले. ही कल्पना पंकज यांच्यासाठी चांगली ठरली पण आता ही संकल्पना वाढवण्यासाठी शहराच्या इतर भागात याचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. व्यवसाय वाढवण्यासाठी खर्च, आर्थिक बाबींचाही विचार करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.