मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातलं आहे. सगळीकडे पाणी भरलं गेलंय. याचे कितीतरी व्हिडडीओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झालेत. यात एका महिलेचाही व्हिडीओ आहे. ही महिला रस्त्यावरील मॅनहोलजवळ उभी राहून गाड्यांना रस्ता दाखवत आहे. जेणेकरून अपघात होऊ नये. भर पावसात महिलेने केलेल्या या कामासाठी त्याचं सोशल मीडिया कौतुक केलं जात आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांचं स्वत:चं घर आणि मुलींच्या शिक्षणासाठी जमवलेले १० हजार रूपये सुद्धा वाहून गेले. आता त्यांना मुलींच्या शिक्षणाची चिंता लागली आहे.
हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी Bhayander Gudipadva Utsav फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला. त्यात दावा करण्यात आला होता की, 'हा व्हिडीओ माटुंगा वेस्टच्या तुलसी पाइप रोडा आहे. या महिलेने साचलेले पाणी जावं म्हणून आधी मॅनहोल उघडलं आणि नंतर ५ तास त्याजवळ उभी राहून लोकांना मार्ग दाखवत आहेत'. आधी या महिलेची काहीच माहिती समोर आली नव्हती. पण आता त्यांची ओळख पटली आहे.
मिररने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेचं नाव आहे कांता मारुती कालन. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळच्या तुलसी पाईप रोडवर फुटपाथवर राहतात. रस्त्यावर फुले विकून त्या घर चालवतात. कांता यांना एकूण ८ मुलं-मुली. त्यातील सहा मुलांची लग्ने झालीत. आता त्या आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या जानकी आणि तमिलश्री या दोन मुलींबरोबर राहतात. पती आजारी असून ते वेगळे राहतात. दुर्दैवाची बाब म्हणजे त्या जेव्हा मॅनहोलजवळ सात तास उभे राहून, पाणी घरी परतल्या तेव्हा त्यांना 'घर' वाहून गेलेलं दिसलं. इतकेच नाही तर दोन्ही मुलींच्या शिक्षणासाठी साठवलेले दहा हजार रुपयेही घरासोबत वाहून गेले.
मॅनहोलचं झाकण उघडून त्यांनी साचलेल्या पाण्याला मोकळी वाट करून दिली. इतकेच नाही तर मॅनहोलमध्ये पडू नये म्हणून तिथे सात तास उभ्या राहिल्या. त्यांच्या या समाजकार्यासाठी त्यांचं सोशल मीडियातून कौतुक होतंय. पण संतापजनक बाब म्हणजे मुंबई महापालिकेला याची काही गरजही वाटली नाही. मुंबई महापालिकेने उलट त्यांना 'आमच्या परवानगीविना मॅनहोलचे झाकण का उघडले' अशी विचारणा केली.
त्यांनी सात मॅनहोलजवळ उभे राहून अनेकांचे प्राण तर वाचवलेच. सोबतच प्रशासनाचं काम स्वत: करत पाण्याला मार्ग मोकळा करून दिला. मात्र, आता मुलींच्या शिक्षणाचे पैसे वाहून गेल्याने त्यांच्या शिक्षणाची चिंता कांताबाई यांना लागली आहे. त्यांचा या कामासाठी त्यांना सलाम!