20 वर्षानंतर संशोधकांना प्रागैतिहासिक काळातील एका गूढ प्राण्याचा शोध लागला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हा प्राणी अजूनही पृथ्वीवर जीवंत आहे. ऑस्ट्रेलियातील मार्गारेट रिव्हर शहरात राहणाऱ्या टूर गाईड आणि मार्गारेट रिव्हर डिस्कव्हरी कंपनीचे प्रमुख सीन ब्लॉक्सिज यांनी स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्राण्याचा शोध लागला आहे.
या प्राण्याचे नाव 'लॅम्प्रेयस'( Lampreys ) आहे. लाखो वर्षांपूर्वीपासून हा प्राणी पृथ्वीवर असल्याचे मानले जाते. असे म्हणतात की हा प्राणी शिकार करणाऱ्या प्राण्यांचे रक्त पितो. काही लोक याला व्हॅम्पायर फिशदेखील म्हणतात. चांगली बाब म्हणजे, हा प्राणी मानवांसाठी धोकादायक मानला जात नाही. जगभरात अनेक प्रकारचे लॅम्प्रेयस आढळतात, त्यापैकी बरेच नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचले आहेत आणि काही नामशेष झालेही आहेत.
सीन ब्लॉक्सिज यांनी सांगितल्यानुसार, ते गेल्या 20 वर्षांपासून या प्राण्याचा शोध घेत होते. या प्राण्याबद्दल त्यांनी अनेक किस्से ऐकले होते. या प्राण्याचा शोध लागल्यानंतर ते खूप खुश झाले. दरम्यान, सीन यांना सहा लॅम्प्रेयस आढळून आले आहेत. एका झऱ्याच्या पाण्यामध्ये हे लँम्प्रेयस आढळून आले आहेत.
रिपोर्टनुसार, लॅम्प्रेयस आपला सुरुवातीचा वेळ गोड्या पाण्यात घालवतात आणि नंतर समुद्रात जातात. नंतर ते पुन्हा नदीच्या दिशेने येतात आणि नंतर मरतात. ऑस्ट्रेलियातील मर्डाक युनिव्हर्सिटीचे सीनियर रिसर्च फेलो स्टीफन बिट्टी यांनी सीन ब्लॉक्सिजचे अभिनंद केले असून, ही महत्वाची माहिती जगासमोर आणल्याबद्दल आभारही मानले आहेत.