Nag Panchmi 2020 : वर्षातून एकदा केवळ नाग पंचमीला उघडतं हे मंदिर, वाचा काय आहे पौराणिक मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 02:40 PM2020-07-25T14:40:02+5:302020-07-25T14:43:09+5:30
हे मंदिर उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिसऱ्या माळ्यावर आहे. हे मंदिर केवळ नाग पंचमीलाच उघडलं जातं. अशी मान्यता आहे की, नागराज तक्षक या मंदिरात राहतात.
आज नाग पंचमी म्हणजे देशभरात नाग देवतेची पूजा केली जाते. तशी तर भारतात नागांची अनेक मंदिरे आहेत. पण एक असं मंदिर आहे जे वर्षातून केवळ एकदा उघडलं जातं. हे मंदिर आहे नागचंद्रेश्वर जे उज्जैनमध्ये आहे. हे मंदिर उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिसऱ्या माळ्यावर आहे. हे मंदिर केवळ नाग पंचमीलाच उघडलं जातं. अशी मान्यता आहे की, नागराज तक्षक या मंदिरात राहतात.
काय आहे मान्यता?
भगवान शंकराला मनवण्यासाठी सर्पराज तक्षकाने कठोर तपस्या केली होती. त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवान शंकराने राजा तक्षक नागाला अमरत्व वरदान दिलं होतं. एका मान्यतेनुसार, तेव्हापासूनच तक्षक राजाने भगवान शंकरासोबत राहणे सुरू केले होते. पण राजा तक्षकाची इच्छा होती की, त्यांच्या एकांतात कोणताही विघ्न येऊ नये. तेव्हापासून ही प्रथा आहे की, नागपंचमीच्या दिवशीच ते दर्शन देतात. हेच कारण आहे की, या मंदिराचं दार केवळ नाग पंचमीलाच उघडलं जातं.
नाग पंचमीच्या दिवशी जेव्हा मंदिराचं दार उघडलं जातं तेव्हा भक्तांची लांब रांग लागलेली असते. नाग पंचमीला या मंदिराचं दार रात्री १२ वाजता उघडलं जातं. दुसऱ्या दिवशी १२ वाजता बंद केलं जातं. इथे केली जाणारी पूजेची व्यवस्था महानिर्वाणी सन्यास्यांद्वारे केली जाते. पण यावर्षी कोरोनामुळे मंदिर बंदच आहे.
असे सांगितले जाते की, ११ व्या शतकातील परमारकालीन मूर्ती या मंदिरात आहे. यात शिव-पार्वतीवर छत्र बनून फना काढलेली नाग देवता आहे. ही मूर्ती नेपाळहून आणली गेली होती. मंदिराच्या दुसऱ्या भागात भगवान नागचंद्रेश्वर शिवलिंग रूपात विराजमान आहे.