हिंदीत एक म्हण आहे आसमान से गिरे, खजूर में अटके...या म्हणीला साजेशी एक घटना समोर आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये पोलिसांना घाबरून एक गन्हेगार अशा जागी जाऊन लपला जिथे मृत्यूशिवाय काही नव्हतं. तो लपण्यासाठी ऑस्ट्रेलियातील सुदूर उत्तरी परिसरातील मॅनेग्रूव्समध्ये जाऊन पोहोचला. हा परिसर पूर्णपणे मगरींचा आहे. तो अनेक दिवस इथे लपून राहिला. त्याचे कपडे फाटले. तो गोगलगाय खाऊन पोट भरत राहिला. तो कसा वाचला ते जाणून घेऊ.
ऑस्ट्रेलियातील डार्विन परिसरात राहणारे दोन मच्छिमार केविड ज्वाइनर आणि कॅम फॉस्ट मॅनग्रूव्सकडे मासे पकडण्यासाठी जात होते. तेव्हाच त्यांना एका मनुष्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तर एक अंगात कपडे नसलेली व्यक्ती झाडाच्या फांदीवर लटकलेली आहे आणि मदत मागते आहे.
केविन आणि कॅमने त्याला व्यवस्थित पाहिलं तर त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. शरीरावर मगरीने चावल्याचे निशाण होते. तो मातीने पूर्णपणे माखलेला होता. तो फार कमजोर आणि बारीक झालेला दिसत होता. त्याला खायला न मिळाल्याने त्याचे हाडं दिसू लागली होती.
कॅम आणि केविनने सांगितले की, आम्हाला माहीत नाही तो किती दिवसांपासून तिथे लपला होता. मात्र, बोलता बोलता त्या गुन्हेगाराने सांगितले की, नव्या वर्षाच्या आदल्या रात्री तो तिथे आला होता. त्याला काही ठिकपणे आठवत नाही. तो या परिसरात फिरत आला होता आणि रस्ता विसरला होता.
पोलिसांपासून पळालेल्या या व्यक्तीला केविन आणि कॅमने नावेत बसवलं. त्याला घालायला कपडे दिले आणि पिण्यासाठी बीअर दिली. नंतर त्याला घेऊन ते डार्विन शहराकडे गेले. जसा तो अॅम्बुलन्सने हॉस्पिटलमध्ये पोहोचला पोलिसांनी त्याला अटक केली.
ऑस्ट्रेलियाच्या नॉर्दन टेरीटरी वॉच कमांडर लेन टर्नरने सांगितले की, त्या गुन्हेगारावर पोलिसांच्या निरीक्षणाखाली उपचार होत आहेत. त्याच्यावर अनेक केसेस आहेत. ज्यात शस्त्रांचा धाक दाखवून लूट करणे असे गुन्हे आहेत. तो बरा झाल्यानंतर त्याला तुरूंगात शिफ्ट केलं जाईल.