रेवदंडा : नारळाचे उत्पादन म्हणजे कोकणचे हमखास उत्पादन देणारा व्यवसाय. मात्र गेल्या काही वर्षातील या नारळ बागायतीतील समस्यांमुळे युवा बागायतदारवर्ग या उत्पादनापासून दूर जात आहे. याच युवावर्गाला या व्यवसायापर्यंत आणण्यासाठी रेवदंड्यात खास नारळमित्र प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. रेवदंड्यातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला. येथील दिलीप पाटील यांच्या वाडीत केरळ नारळ विकास मंडळ व कृषक कल्याणकारी संस्था, चौल यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ मित्र प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या सहा दिवस सुरू असलेल्या प्रशिक्षण शिबिरात २० युवकांनी सहभाग घेत माहितीही घेतली. दिवसेंदिवस नारळ झाडावरुन उतरवणे हे बागायतदारांना पाडेकरी संख्या घटत चालल्याने जिकिरीचे वाटत आहे. त्यात जुन्या झाडांवर पाडेकरी चढेनासे झाल्याने नारळ काढणी यंत्रामुळे नारळाची पाडण करणे सोपे ठरणार आहे. यातून युवकांना रोजगाराची नवीनच संधी चालून आल्यासारखे आहे. दापोलीमधील प्रशिक्षक नारळ मित्र अमोल मळेकर व रुपेश तांबडे यांनी हे प्रशिक्षण दिले. तांबडे यांनी माहिती देताना सांगितले की, गेले तीन वर्षात ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गुजरात राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम झाले असून सुमारे ६०० जणांनी यात सहभाग घेतला. यात मुली तीन टक्के आहेत. (वार्ताहर)
रेवदंड्यात युवकांना लाभले ‘नारळमित्र’ प्रशिक्षण
By admin | Published: February 23, 2015 10:15 PM