पृथ्वीप्रमाणेच अंतराळात कुठं जीवसृष्टी आहे का?, असेल तर ती कुठं आणि कशी असेल याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. एलियन्स (Aliens) अर्थात परग्रहावरच्या जीवांचा शोध सुरूच आहे. वेगवेगळे सिनेमे, यूट्यूबवरच्या व्हिडिओंमध्ये एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल दावे केले जातात. परंतु, या शास्त्रज्ञांनी (Scientist) दाव्यांना शास्त्रीयदृष्ट्या दुजोरा दिलेला नाही. एलियन्सचा शोध लागला नसला तरी, त्यांचे अस्तित्वही पूर्णपणे फेटाळण्यात आलेले नाही.
बाह्य अंतराळकक्षांत पृथ्वीचं लोकेशन उघड करण्याच्या नासाच्या योजनेमुळे अनावधानानं एलियन्सकडून हल्ला होऊ शकतो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या संबंधी इशारा दिला आहे. 'बिकन इन द गॅलेक्सी' हा बायनरी कोडेड मेसेज आणि सौरमंडळ, पृथ्वीचा पृष्ठभाग आणि मानवतेबद्दल सर्व माहिती आकाशगंगेतल्या एका भागात प्रसारित करण्यात येणार आहे. हा भाग म्हणजे एलियन्सचे संभाव्य घरच आहे असं मानलं जातं.
'डेलीमेल'च्या वृत्तानुसार, नासाचा हा मेसेज अरेसिबो मेसेज (Arecibo Message) चं अपडेटेड रूप आहे. या मेसेजनं रेडिओ टेलिस्कोपच्या सहाय्यानं अशाच प्रकारची माहिती 1974 मध्ये अंतराळात प्रसारित केली होती. तथापि, अशा प्रकारची माहिती अंतराळात उघड करणं जोखमीचं ठरू शकतं, असा इशारा ऑक्सफर्ड विद्यापीठामधील फ्युचर ऑफ ह्युमॅनिटी इन्स्टिट्युटचे (FHI) वरिष्ठ संशोधक अँडर्स सँडबर्गनं दिला आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा पाठवणार आहे. हा मेसेज मिळाला तर एलियन्स पृथ्वी शोधून काढतील आणि कदाचित पृथ्वीवर हल्ला करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
संशोधक अँडर्स सँडबर्ग 'द डेली टेलिग्राफ'शी बोलत होते. ते म्हणाले की, हा मेसेज एलियन सभ्यतेपर्यंत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. परंतु, त्याचा परिणाम खोलवर होऊ शकतो, त्यामुळे त्याला खूपच गंभीरतेनं घेण्याची गरज आहे. एलियन्सबद्दलच्या संशोधनात एक गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे, ती ही की अनेक लोक याच्याशी संबंधित कोणतीही गोष्ट गंभीरतेनं घेण्यास नकार देतात. लोकांची ही कृती लाजिरवाणी आहे. कारण ही खरंच खूपच आवश्यक गोष्ट आहे. नासाचा हा मेसेज एलियन्सना प्रतिक्रिया देण्यासाठी आमंत्रित करण्यापुरता असेल आणि नंतर तो लोप पावेल. यामध्ये सोलर सिस्टिमच्या लोकेशनसह पृथ्वीवर जीवसृष्टी आणि जैवरासायनिक संरचनेबद्दल माहिती दिली जाईल.
हा विषय जितका मनोरंजक दिसत आहे, तितकाच गंभीर आहे. कारण एलियन्सच्या अस्तित्वाविषयी शास्त्रज्ञांमध्येसुद्धा मतभेद आहेत. आतापर्यंत इतर ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचे ठोस पुरावे मिळाले नाहीत. हे संशोधन पुढेही सुरूच राहील. इतर ग्रहांवर जीवन असू शकतं आणि नसूही शकतं. कदाचित माणूसच एलियन्सला शोधून काढेल, किंवा एलियन्स माणसाला शोधून काढतील.