नवी दिल्ली – एका बहिणीसाठी तिचा भाऊ वाईट मार्गावरुन चांगल्या वाटेवर येत नवीन जीवनाला सुरुवात करत असेल, तर त्यापेक्षा अधिक आनंद कशात असेल. रक्षाबंधनाच्या दिवशी अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना छत्तीसगडमधील आहे. याठिकाणी एका नक्षलाने बहिणीच्या भावूक आवाहनानंतर नक्षलवादाचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले आहे.
छत्तीसगडमधील नक्षली प्रभाव असलेला जिल्हा दंतेवाडा येथील एका नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांना शरण येऊन त्याने आपल्या बहिणीकडून राखी बांधली आहे. बहिणीचा सल्ला ऐकून परत आलेल्या भावाला पाहून बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहू लागले. या आत्मसमर्पण केलेल्या नक्षलीचं नाव मल्ला असं आहे. त्याच्यावर अनेक कारस्थाने आणि बाँम्बस्फोटांना जबाबदार असल्याचा आरोप आहे. या मल्लाला पकडण्यासाठी पोलिसांनी ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. मल्ला हा नक्षली कमांडर होता.
२३ जुलै रोजी मल्लाच्या बहिणीने त्याला नक्षलवादाचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केले होते. ती म्हणाली होती की, दादा, मी तू नक्षली मार्ग सोडून घरी परत ये, अनेक वर्षापासून माझ्या भावाच्या हातावर मला राखी बांधता आली नाही. यंदाच्या वर्षी ही राखी बांधण्याची मला संधी दे, तू घरी परत ये असं बहिणीने भावूक आवाहन केले होते. त्यानंतर मल्लानं बहिणीचा हा व्हिडीओ पाहून नक्षलवादाचा मार्ग सोडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.