मुंबई : दर 12 वर्षांनी भरणाऱ्या कुंभमेळ्याबाबत तुम्ही ऐकलं असेल पण कधी तुम्ही अशा फुलाबाबत ऐकलंय का जे कुंभमेळ्यासारखंच 12 वर्षांनी एकदा फुलतं? जर उत्तर नाही असेल तर आम्ही तुम्हाला अशाच एका फुलाबाबत सांगणार आहोत. महत्वाची बाब म्हणजे हे फूल बघण्यासाठी अनेकांनी आधीच प्लॅन केलाय. चला जाणून घेऊया या फुलाबद्दल खासियत आणि त्या ठिकाणाबद्दल...
केरळमध्ये फुलतं हे सुंदर नीलकुरिन्जी फूल
तसे तर तुम्ही अनेक फुले पाहिले असतील पण 12 वर्षातून केवळ एकदा फुलणारं हे फूल कधी पाहिलं नसेल. केरळच्या मुन्नारमध्ये प्रत्येक 12 वर्षांनी नीलकुरिन्जी हे फूल फुलतं. हे फूल बघण्यासाठी केवळ भारतातूनच नाहीतर परदेशातीलही लोक येतात.
तीन महिने बघता येणार फुलं
याआधी हे फूल 2006 मध्ये फुललं होतं. आता यावर्षी पुन्हा हे फूल फुलणार असून तीन महिने बघता येणार आहे. भारतात या फुलाच्या एकूण 46 प्रजाती आढळतात. ज्याची सर्वात जास्त संख्या ही मुन्नारमध्ये आहे. जुलैच्या सुरुवातीला हे फूल फुलणार आहे.
इतके पर्यटक येण्याची शक्यता
मीडिया रिपोर्टनुसार, केरळ पर्यटन विभागाचे निर्देशक पी. बाला किरण यांनी सांगितले की, हे फूल फुललेले असताना मुन्नार येणे सर्वात आनंददायी असते. 2017 मध्ये 628,427 पर्यटक मुन्नारमध्ये हे फूल पाहण्यासाठी आले होते. तर 2016 मध्ये 467, 881 पर्यटक आले होते. यावर्षी मुन्नारमध्ये 79 टक्के जास्त पर्यटक येण्याची शक्यता आहे.