New Year Celebration 2023: ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीचा वीकेंड भारतभरात जल्लोषात साजरा करण्यात आला. दोन वर्षे कोरोनाच्या प्रतिबंधांमुळे साधेपणाने नववर्षाचे स्वागत करणाऱ्या भारतीयांनी, यंदा मात्र गेल्या दोन वर्षांचीही कसर भरून काढली. नवीन वर्ष चालू होताच, अनेक कंपन्यांनी गेल्या वर्षभरातील त्यांचा डेटा शेअर करण्यास सुरुवात केली. लोकप्रिय हॉटेल चेन OYO ने देखील एक अतिशय रोमांचक असा डेटा शेअर केला. त्यांच्या डेटावरून एक वेगळीच गोष्ट दिसून आले. गोवा हे भारतातील लोकांचे नवीन वर्ष साजरे करण्याचे आवडेत ठिकाण असल्याचे मानले जाते. पण यंदाच्या वर्षी गोव्याच्या ऐवजी एका वेगळ्याच शहराने पहिली पसंती मिळवल्याचे दिसून आले.
OYO चे सीईओ रितेश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर सांगितले की, २०२२ च्या शेवटच्या दिवशी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक वाराणसी या शहराकडे वळले. नवीन वर्षासाठी लोकांनी गोव्यापेक्षा वाराणसीसाठी अधिक हॉटेल रूम्स बुक केल्याचे दिसले. गोवा हे शहर समुद्रकिनारा आणि नाइटलाइफसाठी लोकप्रिय आहे, तर उत्तर प्रदेशातील वाराणसी याच्या अगदी उलट असून त्याला आध्यात्मिक शहर मानले जाते. ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये अग्रवाल यांनी लिहिले, "गोव्यातील बुकिंग तासाभराने वाढत आहेत. पण नीट अंदाज घेतला तर एक असे शहर आहे, जे गोव्याला मागे टाकत आहे... ते शहर आहे वाराणसी. तळटीप: आम्ही जगभरातील सुमारे ७००हून अधिक शहरांना सेवा देतो."
कोविडमुळे गेली दोन वर्षे लोकांना कोणतेही मोठे सण-समारंभ साजरे करण्यासाठी निर्बंध होते. पण आता धोका कमी झाल्यापासून, नवीन वर्षात लोकांनी शिमला, गोवा, आग्रा आणि वाराणसी यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली. अग्रवाल यांच्या मते, जागतिक स्तरावर साडे चार लाखांहून अधिक बुकिंग नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला होती, जे २०२१ च्या तुलनेत ३५ टक्क्यांनी जास्त होते. दुसर्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत या वेळी OYO ने सर्वाधिक बुकिंग केले. त्यांनी लिहिले, "आम्ही गेल्या ५ वर्षात आज भारतात प्रति हॉटेल प्रति दिवस सर्वाधिक बुकिंग पाहत आहोत."
--
३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांच्या ट्विटमध्ये एक आलेख शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये अग्रवाल यांनी सांगितले की, ट्विट करेपर्यंत OYO अॅपवरील किंमतीतील बदल १२.७ दशलक्ष पटीने वाढला होता.