अनेकदा आपल्याजवळ अशा काही अमूल्य वस्तू असतात, ज्यांची किंमत आपल्याला माहीत नसते. नायजेरियातील एका परिवारासोबतही तसंच झालंय. त्यांच्या घरात एक पेंटिंग लावलेली होती. या परिवाराला या पेंटिंगबाबत काहीच माहीत नव्हती. एक दिवस अशीच पेंटिंगवरील सही परिवाराने गुगलवर सर्च केली आणि त्यांचं नशीब पालटलं. जी पेंटिंग ते सामान्य समजत होते, त्या पेंटिंगला ११ लाख पाउंड म्हणजेच साधारण १० कोटी रूपये किंमत मिळाली.
ही पेंटिंग नायजेरियन कलाकार बेन इनवॉनवूने १९७१ मध्ये लागोसमध्ये तयार केली होती. पेंटिंग 'आफ्रिकन मोनालिसा'ची आहे. बेनला २०व्या शतकात आफ्रिकन आधुनिकीकरणाचा जनक मानलं जात होतं. त्यांची ही पेंटिंग 'क्रिस्टीनी' १९७१ पासूनच या परिवाराकडे होती.
अंदाजापेक्षा ७ पटीने अधिक किंमत
लंडन येथील लिलाव संस्था हाउस सोथेबीच्या फ्री ऑनलाइन एस्टिमेट प्लॅटफॉर्मवर जेव्हा परिवाराने या पेंटिंगवरील हस्ताक्षर गुगल केले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या पेंटिंगला लिलावाआधी लावण्यात आलेल्या अंदाजापेक्षा ७ पटीने अधिक किंमत मिळाली. या पेंटिंगमध्ये इफिची राजकुमारी एडीतुतुचं चित्र काढण्यात आलं होतं.
राजकुमारीच्या तीन पेंटिंग्स
बुकर पुरस्कार विजेते कादंबरीकार बेन ओकरी यांनी सांगितले की, ही पेंटिंग नायजेरिअन लोकांसाठी एक राष्ट्रीय प्रतिक आहे. हीला आफ्रिकेची मोनालिसा मानलं जातं. बेन इनवॉनवू यांचं १९९४ मध्ये निधन झालं होतं. बेनने राजकुमारी एडीतुतुच्या तीन पेंटिंग्स तयार केल्या होत्या. १९६० च्या दशकात नायजेरिया-बियाप्रान संघर्षादरम्यान ही पेंटिंग शांतीचं प्रतिक बनली होती.