हिसार, दि. 21- एका जुन्या नाण्यामुळे एक व्यक्ती अवघ्या काही मिनिटांमध्ये करोडपती बनल्याची घटना घडली आहे. हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील डबवाली गावात ही घटना घडली आहे. हरियाणाच्या एका खेड्यात छोटंमोठं काम करणाऱ्या एका व्यक्तिची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. त्यासाठी त्याने घरातील भंगार विकायला काढलं होतं. भंगार काढत असताना त्याला घरातील जुन्या संदूकमध्ये इस्लामिक काळातील एक नाणं सापडलं आणि तो एका रात्रीत कोट्यधीश झाला. दुबईतील एका व्यक्तिनं या नाण्यासाठी दीड कोटी रूपये देण्याची तयारी दाखवली आहे, पण त्याला मात्र साडे तीन कोटी रूपये हवे आहेत. कारण हे नाणं तब्बल ५६७ वर्ष जुनं आहे.
हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील डबवाली गावच्या या दुकानदाराचं नाव गौरीशंकर उर्फ विक्की डबवाली असं आहे. तो सिरसा रोडवर सीट तयार करण्याचं काम करतो. या कामातून त्याला अत्यंत तुटपुंजी कमाई होते. त्यातून घरही चालवता येत नाही. त्यामुळे त्याने घर खर्च चालविण्यासाठी रविवारी घरातील भंगार विकण्याचा निर्णय घेतला. हे भंगार काढत असताना त्याला घरात एक जुनी संदूक सापडली. त्यात हे नाणं होतं. नाणं सापडल्यानंतर गौरीशंकर यांनी ते नाणं स्वच्छ केलं. त्यांना त्या नाण्यावर उर्दू भाषेत काही तरी लिहिलेलं दिसलं. त्यामुळे हे नाणं ऐतिहासिक असल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं पण त्या नाण्यावर नेमकं काय लिहिलं आहे, हे त्यांना वाचता आलं नाही.
नाणं स्वच्छ करून गौरीशंकर गावातील मशीदीतील इमामाकडे गेले आणि त्यांना हे नाणं दाखवलं. ते नाणं पाहून इमामही थक्क झाले होते. इमामाने नाण्यावरील मजकूर वाचल्यानंतर ते नाणं १४५० मधील असल्याचं आढळून आलं. शिवाय नाण्यावर मदिना शहर असं लिहिलेलं आहे. गौरीशंकर यांनी नंतर या ५६७ वर्ष जुन्या नाण्याचा फोटो आपल्या मित्रांकडून दुबईपर्यंत पाठवला. तिथे एका व्यक्तिने दीड कोटी रूपयांत हे नाणं घेण्याची तयारी दाखवली. पण गौरीशंकर यांना हे नाणं साडे तीन कोटीत विकायचं आहे. एका रात्रीत गौरीशंकर यांचं नशिब पालटलं, अशी चर्चा गावात सुरू झाली आहे.