कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावा दरम्यान लॉकडाउन सुरू आहेत आणि यातच प्रवासी मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं जात आहे. या कामात सरकारसोबतच अनेक लोकही समोर येत आहे. नोएडामध्ये राहणारी एक 12 वर्षांची विद्यार्थीनी देखील मजूरांच्या मदतीसाठी समोर आली आहे. या मुलीने तिचे बचत केलेले 48 हजार रूपये खर्च करून तीन प्रवासी मजूरांना झारखंडला पाठवलं. केवळ त्यांना घरी पाठवलं असं नाही तर विमानाने घरी पाठवलं.
निहारिका द्विवेदी असं या मुलीचं नाव असून तिने सांगितले की, समाजाने तिला खूपकाही दिलं आहे. आता तिचीही काही जबाबदारी आहे की, या अडचणीच्या काळात समाजासाठी काहीतरी करावं. निहारिकाच्या या कामाचं लोकांकडून भरभरून कौतुक केलं जात आहे.
निहारिकाच्या मदतीने तीन मजूरांना केवळ घरी जायला मिळालं नाही तर त्यांना पहिल्यांदा विमानाचीही सैर करायला मिळाली. निहारिका त्यांची मदत करून आनंदी आहे. तर झारखंडमध्ये राहणाऱ्या मजूरांनी तिचे आभार मानले आहेत.
दरम्यान याआधी नॅशनल लॉ स्कूल बंगळुरूतील माजी विद्यार्थ्यांनी देणगी जमा करून मुंबईत अडकलेल्या 180 मजूरांना विमानाने रांचीला पाठवलं होतं. विद्यार्थ्यांना जेव्हा समजलं की, काही मजूर मुंबई आयआयटीजवळ फसले आहेत आणि त्यांच्याकडे पैसे नाहीत. तर या विद्यार्थ्यांनी त्यांची मदत करण्याची योजना केली. यात एका संस्थेच्या आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना विमानाने झारखंडला पाठवण्यात आलं.
आश्चर्याची बाब म्हणजे मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची नावे जाहीर केली नाहीत. त्यांचं मत आहे की, त्यांनी ही मदत नाव कमावण्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेली नाहीत.