लंडन : आईस्क्रीम सर्वांनाच आवडते; पण ते फ्रीझरमधून काढले की लगेच विरघळू लागते आणि खाऊन संपेपर्यंत त्याचे पार पाणी होऊन जाते. त्यामुळे आईस्क्रीम हळूहळू, जिभेवर घोळवत, चव घेत खात राहिले तर शेवटी ते प्यायची वेळ येते; पण जपानमधील कानाझावा विद्यापीठातील वैज्ञानिकांनी आता आईस्क्रीम खोलीच्या तापमानाला तीन तासांपर्यंत न विरघळता जसेच्या तसे राहू शकेल, याचे तंत्र विकसित केले आहे.‘दि टाइम्स’ दैनिकांने दिलेल्या बातमीनुसार स्ट्रॉबेरीमधून मिळणारे ‘पॉलिफिनॉल’ नावाचे द्रव आईस्क्रीममध्ये मिसळून वैज्ञानिकांनी हे साध्य केले आहे. ‘पॉलिफिनॉल’ द्रवामुळे पाणी आणि स्निग्धता यांचे विलगीकरण होण्याची प्रक्रिया संथगतीने होते. त्यामुळे आईस्क्रीम चटकन न विरघळता त्याचा आकार बराच वेळ तसाच राहू शकतो, असे या वैज्ञानिक चमूचे प्रमुख प्रा. तोमिबिसा ओता यांनी सांगितले.आपल्या या प्रयोगाचे यश तपासून पाहण्यासाठी वैज्ञानिकांनी फ्रीझरमधून प्लेटमध्ये काढून ठेवलेल्या आईस्क्रीमवर हेअरड्रायरने पाच मिनिटे गरम हवेचा झोत सोडला तरीही ते आईस्क्रीमचे गोळे न विरघळता जसेच्या तसे राहिले!या तंत्राने बनविलेले चॉकलेट, व्हॅनिला व स्ट्रॉबेरीच्या स्वादाचे आईस्क्रीम या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत खाण्यासाठी उपलब्धही करून दिले.
जपानमधील कानाझावा विद्यापीठातील वैज्ञानिकांनी शोधलं न विरघळणारे आईस्क्रीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:46 AM