(Image Credit : Social Media)
दरवर्षी नॉर्थ कोरियातून पळून जाऊन साऊथ कोरियामध्ये शरण जाणाऱ्यांची संख्या बरीच असते. नॉर्थ कोरियातून पळून आलेले हेच लोक किम जोंग उन यांच्या क्रूर शासनाचे किस्सेही सांगतात. साऊथ कोरियाच्या सियोलमध्ये राहत असलेली अभिनेत्री नारा कांग याच पळून आलेल्या लोकांपैकी एक आहे. नाराने असाही दावा केला आहे की, नॉर्थ कोरियातील तरूण किम जोंग उनला वैतागले असून वेगवेगळ्या पद्धतीने त्याला विरोध करत आहेत.
(Image Credit : refinery29.com)
नाराने सांगितले की, नॉर्थ कोरियामध्ये लाल रंगाची लिपस्टिक लावण्यावर बंदी आहे. लाल लिपस्टिक लावून रस्त्यावर फिरणं तिथे एखाद्या स्वप्नासारखं आहे. CNN ला दिलेल्या मुलाखतीत २२ वर्षीय नाराने सांगितले की, नॉर्थ कोरिया सरकार लाल लिपस्टिकला कॅपिटलिज्मचं प्रतीक मानतं आणि त्यामुळेच यावर बंदी आहे. नाराने सांगितले की, या सगळ्या गोष्टींना वैतागूनच तिने नॉर्थ कोरिया सोडण्याचा निर्णय घेतला होता.
आणखी काही गोष्टींवर बंदी
नॉर्थ कोरियामध्ये केवळ लाल लिपस्टिकवरच नाही तर इतरही काही गोष्टींवर बंदी आहे. नाराने सांगितले की, तिथे महिला ओठांवर केवळ पारदर्शी जेल किंवा फार फार तर गुलाबी रंगाची लिपस्टिक लावू शकतात. या सर्व गोष्टींवर कंट्रोल ठेवण्यासाठी तिथे पोलिसही आहेत.
(Image Credit : independent.co.uk)
नाराने सांगितले की, जर नॉर्थ कोरियामध्ये तुम्हाला मेकअप करायचं असेल तुम्हाला तुमचं जीवन धोक्यात घालावं लागतं. कारण येथील लोकच तुमच्यावर टीका करू लागतात. सोबतच रस्त्यावर दर १० मीटरवर तुम्हाला मेकअप पोलीस पेट्रोलिंग करताना दिसेल. नॉर्थ कोरियात अंगठी, ब्रेसलेट घालण्यावरही बंदी आहे. तसेच ठरवलेल्या हेअर स्टाइलपैकीच एक हेअर स्टाईल निवडावी लागते. इतकेच नाही तर महिला केस मोकळे करून फिरू शकत नाहीत.
मेकअप पोलिसांपासून बचाव अशक्य
CNN च्या एका रिपोर्टनुसार, २०१० ते २०१५ दरम्यान नॉर्थ कोरिया सोडून आलेल्या लोकांनी सांगितले की, तिथे मिनी स्कर्ट, ग्राफिक शर्ट, ज्यावर इंग्रजीत काही लिहिलेलं आहे असे कपडे किंवा टाइट जीन्स घालण्यावर बंदी आहे. पहिल्यांदा या नियमांचं उल्लंघन केल्यावर भर चौकात अपमान केला जातो. दुसऱ्यांदा असं काही केलं हा सरकारचा विरोध मानलं जातं. नॉर्थ कोरियात सरकारचा विरोध हा सर्वात मोठा गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते.
ब्लॅक मार्केट तेजीत
नॉर्थ कोरियामध्ये अमेरिका आणि यूरोपमधून आलेल्या प्रॉडक्ट्सचं एक मोठं ब्लॅक मार्केट आहे. या मार्केटमध्ये ब्युटी प्रॉडक्ट्ससहीत, सिनेमे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळतात. २०१० मध्ये पळून आलेली ज्वेलरी डिझायनर जू यांग सांगते की, तिथे तरूण पिढी वर्ल्ड सिनेमा आणि टीव्ही कल्चरपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक मार्ग शोधत आहेत.