नवी दिल्ली- दिल्लीतील एका वकिलाने मंगळवारी मोबाइल मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅपला कायदेशीर नोटीस पाठविली. व्हॉट्सअॅपमध्ये असलेली मिडल फिंगर इमोजी काढण्यासाठी ही नोटीस पाठविण्यात आली असून 15 दिवसांमध्ये मिडल फिंगर इमोजी हटविण्याचं नमूद करण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅपमधील मिडल फिंगर फक्त बेकायदेशीर नसून अश्लिल इशारा असल्याचं नोटीस पाठविलेल्या वकिलांचं म्हणणं आहे. दिल्लीतील कोर्टात प्रॅक्टीस करणारे वकील गुरमीत सिंह यांनी ही नोटीस व्हॉट्सला पाठविली आहे.
मिडल फिंगर दाखविणं फक्त अश्लिल नाही तर अतिशय आक्रमक इशारा आहे. भारतीय दंड विधान कलम 354 आणि 509 अनुसार, महिलांना अश्लिल, बेशिस्त, आक्रमक इशारे करणं अपराध आहे. कुठल्याही व्यक्तीकडून असं वर्तन होणं अवैध आहे, असं वकील गुरमीत सिंह यांनी म्हंटलं आहे.
वकील गुरमीत सिंह यांच्या मते, व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारे मिडल फिंगरच्या इमोजीचा वापर करणं म्हणजे महिलांच्या प्रती अपराधाला प्रोत्साहन देणं आहे. इमोजी एक डिजीटल फोटो असतो ज्याच्या माध्यमातून आपण कल्पना व भावना व्यक्त करतो.
वकील गुरमीत सिंह यांनी व्हॉट्सअॅपला मिडल फिंगर इमोजी 15 दिवसात हटवायला सांगितलं आहे. व्हॉट्सअॅपने जर इमोजी हटविली नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं, त्यांनी म्हंटलं आहे.