मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. मेरठमध्ये एक चोरचोरी करण्यासाठी एका घरात गेला होता. मात्र चोरी केल्यानंतर त्याच्या मनात सकारात्मक विचार निर्माण झाले. त्याचं हृदय परिवर्तन झालं. त्यानंतर त्यानं चोरी केलेल्या घरात जाऊन सर्व सामान परत केलं. याशिवाय चोरी केल्याबद्दल माफीदेखील मागितली. त्यानंतर घरमालकानं चोराला नोकरी दिली. या अनोख्या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आसपास राहणारे सर्वच जण चोर आणि मालकाचं कौतुक करत आहेत.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५८ च्या जवळ पल्लवपुरम पोलीस ठाण्याच्या अंतर्गत राष्ट्रीय लोक दलाचे जिल्ह्याध्यक्ष राहुल देव नारायण यांचं फार्म हाऊस आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी चोरी झाली. हजारो रुपयांचं सामान चोरानं लंपास केलं. पोलिसांनी परिसरातले सीसीटीव्ही तपासले. त्यात पोलिसांना चोर दिसला. त्याच्या आधारे पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला. मात्र मंगळवारी आरोपी स्वत: चोरी केलेलं सामान घेऊन नारायण यांच्याकडे आला. तो माफी मागून रडू लागला.आपल्याला कृत्याचा पश्चाताप झाल्याचं आरोपीनं नारायण यांना सांगितलं. यानंतर नारायण यांनी आरोपीला चोरी करण्याचं कारण विचारलं. त्यावेळी आपली आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून एक वेळच्या जेवणासाठीही पैसे नसल्याचं त्यानं नारायण यांना सांगितलं. आपल्याला काम हवं, असं यावेळी आरोपी म्हणाला. त्यानंतर नारायण यांनी त्याला त्यांच्या फार्म हाऊसवर नोकरी दिली. सध्या या घटनेची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
जिथे केली चोरी, तिथेच करू लागला नोकरी; अनोख्या घटनेची सर्वत्र चर्चा
By कुणाल गवाणकर | Published: January 13, 2021 1:41 PM